जितकी शिवीगाळ तितके कमळ सशक्त; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला | पुढारी

जितकी शिवीगाळ तितके कमळ सशक्त; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : जितकी मला शिवीगाळ होत आहे, तितकेच कमळ सशक्त होत आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.

बेळगाव जिल्ह्यातील कुडची, रायबाग, अथणी, कागवाड, हुक्केरी आणि चिकोडी विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी, मुधोळ तेरदाळ मतदार संघात उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभा झाल्या. यबरट्टी (ता. रायबाग) या गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, खा. अण्णासाहेब जोल्ले, खा. इरण्णा कडाडी, मंत्री शशिकला जोल्ले आदी उपस्थित होते. सुमारे चाळीस मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी विकासकामांचा आढावा घेत काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.

मोदी म्हणाले, काँग्रेसने विकासकामांवर बोलण्याऐवजी शिव्या घालण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिव्या दिल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या दिल्या. आता काँग्रेस मला सतत शिव्या घालत असते. मला त्यांनी आतापर्यंत 91 शिव्या दिल्या आहेत. पण, त्यामुळे कमळ अधिकच फुलत चालले आहे.

सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे कुरण करण्यात आले होते. काँग्रेसच्या या मलईला आम्ही टाळे ठोकल्यामुळे त्यांचा तीळपापड होत आहे. देशातील सुमारे 30 कोटी जनतेला आपण घर, जमिनीचा लाभ देऊन त्यांना लखपती केले. सहकार क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी दहा हजार कोटी तर किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना तेराशे कोटी थेट दिले. काँग्रेसने शेतकर्‍यासांठी राबवलेली कर्जमाफी योजना ही फसवी होती. लहान शेतकर्‍यांची बँकांची खाती आम्ही सुरू करून दिली आणि त्यांना विविध योजनाचा लाभ मिळवून दिला.

Back to top button