अमृतपालसाठी 300 डेर्‍यांत पोलिसांचे सर्च ऑपरेशन! | पुढारी

अमृतपालसाठी 300 डेर्‍यांत पोलिसांचे सर्च ऑपरेशन!

अमृतसर; वृत्तसंस्था :  18 मार्च रोजी फरार झालेला वारिस पंजाबदेचा म्होरक्या खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचा ठावठिकाणा 14 व्या दिवशीही लागलेला नाही. अमृतपाल धार्मिक ठिकाणी लपल्याचे सांगण्यात येते. अमृतसर सुवर्ण मंदिरासह पंजाबच्या सर्वच धार्मिक स्थळांलगत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे अमृतपालने एक व्हिडीओ जारी केला असून, शरणागती पत्करणार नाही, असे त्यात म्हटलेले आहे.

पंजाबमधील 300 हून अधिक डेर्‍यांत अमृतपालसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. जालंधर, कपूरथला, होशियारपूर व भटिंडातील डेरे पोलिसांच्या रडारवर आहेत. पालच्या शोधासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. अमृतपाल आपली इनोव्हा होशियारपूरमध्ये सोडून स्विफ्ट कारमधून फरार झाला होता. या कारच्याही शोधात पोलिस आहेत.

  काय म्हणतो अमृतपाल?

मी पळपुटा नाही. मी परदेशातही पळून जाणार नाही. लवकरच समोर येईन, असे जारी केलेल्या व्हिडीओ, ऑडिओ टेपमध्ये अमृतपाल याने म्हटलेले आहे. अमृतपालचा दुसरा व्हिडीओ कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी, अमेरिकेच्या 8 आयपी अ‍ॅड्रेसवरून इंटरनेटवर टाकण्यात आला आहे.

अमृतपालने सरेंडर करू नये. जवळच पाकिस्तान बॉर्डर असताना अमृतपालने नेपाळला जाण्याची काय गरज होती; रावी ओलांडून पाकला जाता आले असते. तेथे आयएसआयची मदत मिळवता येईल. आम्ही 1984 नंतरही गेलो होतो.
– सिमरनजीत सिंग मान, खासदार, शिरोमणी अकाली दल, संगरूर

Back to top button