Covid 19 : २०९ दिवसांनी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत निच्चांकी घट! | पुढारी

Covid 19 : २०९ दिवसांनी दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत निच्चांकी घट!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Covid 19 : कोरोना तपासण्यांचे प्रमाण कमी होताच कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी तब्बल २०९ दिवसांनी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी घट नोंदवण्यात आली आहे. दिवसभरात केवळ १८ हजार ३४६ कोरोना ( Covid 19 ) रूग्ण आढळले. तर, २९ हजार ६३९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान २६३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मंगळवारी मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.९३ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ३८ लाख ५३ हजार ४८ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ कोटी ३१ लाख ५० हजार ८८६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २ लाख ५२ हजार ९०२ रूग्णांवर (०.७५%) उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ४९ हजार २६० रूग्णांचा (१.३३%) कोरोनाने बळी घेतला.कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे ९१ कोटी ५४ लाख ६५ हजार ८२६ डोस लावण्यात आले आहेत. यातील ७२ लाख ५१ हजार ४१९ डोस सोमवारी लावण्यात आले.

केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ९१ कोटी ७७ लाख ३७ हजार ८८५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील ६ कोटी ७३ लाख ७ हजार २४० डोस अद्यापही राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ५७ कोटी ५३ लाख ९४ हजार ४२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ११ लाख ४१ हजार ६४२ तपासण्या सोमवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. मंगळवारी देशाचा कोरोनाचा आठवड्याचा संसर्गदर १.६६ टक्के तर,दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.६१ टक्के नोंदवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा :

Back to top button