शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा आता घरपोच मिळणार! - पुढारी

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा आता घरपोच मिळणार!

वर्धा; पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांना आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने सातबारा उपलब्ध करून देण्यात येत होता. मात्र यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याच्या उपलब्धतेतवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कुठेही आणि कधीही सातबारा मिळावा म्हणून ऑनलाईन सातबारा आता उपलब्ध करून दिलेला आहे. यासोबतच हा ऑनलाईन सातबारा कसा आहे? त्यामध्ये कुठल्या बाबींचा समावेश केलेला आहे, याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी याहेतूने शासनाने फ्लॅगशिप प्रोग्रॅम राबवत ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे मोहीम सुरू केली आहे. अशा पद्धतीने सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबाराचे वाटप मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी सातबाराचे व्यवस्थित वाचन करून यात काही त्रुटी किंवा चुका झालेल्या असल्यास त्या तात्काळ दुरुस्त करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारावर तलाठ्याची स्वाक्षरी नसल्यामुळे सदर सातबारा कर्ज घेण्यासाठी किंवा कोणतेही व्यवहार करताना बँक किंवा संबंधित विभाग घेत नव्हता. आता शासनाने डिजिटल सहीचा सातबारा सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. या माध्यमातून शासनाने लोकाभिमुख शासनाची कटीबद्धता पूर्ण केली आहे. आता शेतकऱ्यांना फेरफारसुद्धा ऑनलाईन करता येऊ शकतो. यासोबतच शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंद सुद्धा स्वतःच्या मोबाईलद्वारे स्वतः घेता येऊ शकते. हे शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अतिशय चांगली योजना आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सातबारा ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी तो दर तीन -चार महिन्यांनी बघावा, त्यात काही बदल झालेला नाही ना. याची खात्री करावी असेही सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, अप्पर जिल्हाधिकारी मनोज खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

हे ही वाचा :

Back to top button