लखीमपूर खेरी मधील परिस्‍थिती जालियनवाला बाग सारखीच : शरद पवार | पुढारी

लखीमपूर खेरी मधील परिस्‍थिती जालियनवाला बाग सारखीच : शरद पवार

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावर राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे. शेतकर्‍यांच्‍या आंदोलनप्रश्‍नी केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारही असंवेदनशील आहे. जालियनवाला बागमध्‍ये जशी परिस्‍थिती झाली होती, तशीच परिस्‍थिती लखीमपूर खेरी येथे निर्माण झाली असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हिंसाचाराची पूर्ण जबाबदारी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचीच

माध्‍यमांशी बोलताना शरद पवार म्‍हणाले की, लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचीच आहे. याप्रकरणाचा मी निषेध करतो. तसेच केवळ निषेध करुन चालणार नाही. या हिंसाचाराची सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या विद्‍यमान न्‍यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. या घटनेतील वस्‍तुनिष्‍ठ माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यात ५ वर्षीय मुलाचा हळद, कुंकू गुलाल टाकून खून, नरबळीचा संशय

सर्वसामान्‍य शेतकर्‍यांचा आवाज दडपण्‍याचा प्रयत्‍न

तुमच्‍याकडे सत्ता आहे म्‍हणून तुम्‍ही सर्वसामान्‍य शेतकर्‍यांचा आवाज दडपण्‍याचा प्रयत्‍न करत आहात. मात्र यामध्‍ये तुम्‍ही कधीच यशस्‍वी होणार नाही. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. या घटनेतून केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण स्‍पष्‍ट होत आहे. आम्‍ही शेतकर्‍यांबरोबर आहोत, असेही त्‍यांनी सांगितले.

मागील काही महिन्‍यांपासून केंद्र सरकारच्‍या कृषी कायदयाविरोधात दिल्‍लीच्‍या सीमेवर शेतकरी  आंदोलन करत आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्‍ली येथे आंदाेलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी हल्‍ला केला हाेता. याविरोधात देशभरात संतप्‍त प्रतिकिृया उमटल्‍या हाेत्‍या, असेही ते म्‍हणाले.

शेतकर्‍यांच्‍या आंदोलनप्रश्‍नी केंद्र संवेदनशील

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकरी शांततेने आंदोलन करत होते. आपल्‍या न्‍यायहक्‍कांच्‍या मागण्‍या ते मांडत होते. असे असताना थेट त्‍यांच्‍या अंगावर वाहन चढविण्‍यात आले. यामध्‍ये काही आंदाेलकांचा मृत्‍यू झाला. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. शेतकर्‍यांच्‍या आंदोलन प्रश्‍नी केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारचीअसंवेदनशीलता या घटनेतून स्‍पष्‍ट झाली आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

हेही वाचलं का?

Back to top button