AI चॅटबॉट ChatGPT यूपीएससी परीक्षेत नापास, पाहा त्याने काय उत्तरे दिली? | पुढारी

AI चॅटबॉट ChatGPT यूपीएससी परीक्षेत नापास, पाहा त्याने काय उत्तरे दिली?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स– एआय) नवतंत्रज्ञान सध्या चर्चेत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विशिष्ट टोन, शैली आणि सूचनांमध्ये ईमेल लिहिणे यासारख्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. अनेकांनी या तंत्रज्ञानाची सवयच झाल्याचे मान्य केले आहे. या ट्रेंडला अनुसरून, सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC परीक्षेत चॅटबॉट कसं काम करतं याची अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिनने चाचणी घेतली. दरम्यान, चॅटबॉट UPSC प्रिलिम्स २०२२ च्या प्रश्नपत्रिका १, सेट ए मधील १०० पैकी केवळ ५४ प्रश्नांची उत्तरे देऊ शकला.

मॅगझिनने नमूद केले आहे की AI चॅटबॉट UPSC परीक्षेत अयशस्वी ठरला कारण तो २०२१ च्या सर्वसाधारण श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ८७.५४ टक्के कट ऑफ क्लिअर करू शकला नाही. या प्रश्नपत्रिकेत भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास, पर्यावरणशास्त्र, विज्ञान ते चालू घडामोडी, सामाजिक विकास आणि राजकारण विषयांवर प्रश्न होते.

ChatGPT ला विचारले की ते UPSC ची प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होण्यास सक्षम आहे का?. यावर तो ठोस उत्तर शकला नाही. “Al लँग्वेज मॉडेल म्हणून, माझ्याकडे UPSC परीक्षा आणि संबंधित विषयांसह भरपूर ज्ञान आणि माहिती आहे. पण, UPSC प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ ज्ञानच नाही तर अवघड विचार कौशल्य, अनुप्रयोग क्षमता आणि वेळ व्यवस्थापन कौशल्येदेखील आवश्यक आहे. त्यामुळे मी UPSC ची प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेन की नाही यावर मी निश्चित उत्तर देऊ शकत नाही,” असे त्याने म्हटले आहे.

त्यानंतर मॅगझिनने ChatGPT ला प्रश्नपत्रिकेतील सर्व १०० प्रश्न विचारले. अझरबैजान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यापैकी कोणत्या देशांची अफगाणिस्तानशी सीमा आहे असे विचारले असता, चॅटबॉटने पहिल्या चार देशांची नावे सांगितले (बरोबर उत्तर ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान होते). काही प्रश्नांमध्ये ChatGPT ने स्वतःचा पर्याय देखील तयार केला. यूजरने केवळ चार पर्याय दिलेले असूनही त्याने उत्तर निवड म्हणून पर्याय E (Option E) सादर केला.

एनालिटिक्स इंडिया मॅगझिनने म्हटले आहे की, “चॅटजीपीटीचे ज्ञान सप्टेंबर २०२१ पर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे ते चालू घडामोडींच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाही. दरम्यान, चॅटजीपीटीने अर्थशास्त्र आणि भूगोल विषयांशी संबंधित जी चुकीची उत्तरे दिली आहेत ती कालबद्ध नव्हती.”

चॅट-जीपीटी हे भविष्यातील गूगल असल्याचे मानले जाते आहे. हे तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्टच्या अझूर क्लाउडवरून काम करत आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button