Artificial Intelligence: ChatGPT ने चेहरा मोहरा बदलला, अमेरिका चीनसह जगातील स्पर्धा झाली तीव्र | पुढारी

Artificial Intelligence: ChatGPT ने चेहरा मोहरा बदलला, अमेरिका चीनसह जगातील स्पर्धा झाली तीव्र

पुढारी ऑनलाईन: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. दोघेही या नव्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करून पुढे जाण्याच्या धडपडीत गुंतले आहेत. जागतिक तज्ज्ञांच्या मते, गेल्या दशकात चीनने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेव्हलपमेंटबाबतीत अमेरिकेला खूप मागे टाकले आहे. विशेषतः मूलभूत संशोधनात ते पुढे गेले आहेत. पण ज्या वेगाने अमेरिकन स्टार्टअप OpenAI ने ChatGPT बाजारात आणले, त्यामुळे चीनलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ChatGPT हे लेखन आणि परीक्षेची तयारी करण्यासाठीचे चॅटबॉट आहे. त्यामुळे या चॅटबोटची टेक स्पेसमध्ये सर्वात मोठी चर्चा होत आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित इन्वेस्टमेंट फंड वेबबश सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक डॅन इव्हस म्हणाले की, ‘चीनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अमेरिकेपेक्षा अधिक प्रगत आहे. पण ChatGBT मुळे हे बदलू शकते आणि या तंत्रज्ञानाचे नेतृत्व मायक्रोसॉफ्टकडे येऊ शकते. यामुळे चिनी कंपन्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अल्गोरिदम अपग्रेड करण्याचा दबाव वाढेल.

मायक्रोसॉफ्टने गेल्याच आठवड्यात जाहीर केले आहे की, आपले सर्च इंजिन बिंग सुधारण्यासाठी ओपनएआय सोबत काम करेल. जेणेकरुन ते मागील अनेक वर्षांमध्ये सर्च इंजिन गुगलच्या मागे राहिलेले आहेत, ते अंतर कमी करू शकेल. तसेच OpenAI मध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे.

इव्हस पुढे म्हणाले की, ‘हे खरं आहे की ओपनएआयने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक फॉर्मूला शोधून काढला आहे. आता मायक्रोसॉफ्टने त्यातील 50 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्पर्धा तीव्र झाली आहे. हे अमेरिकेत होईल, चीनमध्येही होईल आणि संपूर्ण जगातही होईल.

सर्च इंजिनच्या क्षेत्रात अमेरिकेसह जगातील अनेक भागातील आघाडीची कंपनी गुगलही या शर्यतीत उतरली आहे.त्यांनी Bard AI चॅटबॉट सादर केला आहे. दुसरीकडे चिनी कंपन्याही मागे नाहीत. गेल्या आठवड्यात अलीबाबा ग्रुप होल्डिंग्स, टेनसेंट होल्डिंग्स, बायडू, नेटइज आणि जीडी डॉट कॉमने लवकरच त्यांचे चॅटबॉट्स लॉन्च करण्याची योजना जाहीर केली आहे.

हाँगकाँगस्थित सिटीबँक विश्लेषक अ‍ॅलिसिया याप यांच्या मते, चिनी कंपन्यांमधील चॅटजीपीटी स्पर्धेमुळे बाजारात फारसा गोंधळ होणार नाही. तिथे प्रत्येक कंपनीची व्याप्ती वेगळी असते. बिंग अमेरिकेत गुगलला आव्हान देऊ शकते, परंतु चीनमध्ये बायडूला आव्हान नाही. या कंपनीने मार्चमध्ये आपला ‘एर्नी बॉट’ बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत बड्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे गुंतवणूकदारांचे लक्षही या दिशेने गेले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र सध्या त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. व्हेंचर फंड डीसीएममधील गुंतवणूक व्यवस्थापक ग्लोरिया झांग यांनी एका बेबसाईटला सांगितले की, हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. लोक अजूनही त्याचे वेगवेगळे उपयोग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यामुळे उत्पादकता वाढून उद्योगांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. ते म्हणाले- ‘माझ्या समजुतीनुसार, या तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक उद्योगांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यामध्ये वाणिज्य आणि सोशल मीडियाचा समावेश आहे.

Back to top button