Morbi bridge tragedy | १३५ जणांचा बळी गेला ती मोरबी पूल दुर्घटना कशामुळे घडली?, SIT अहवालातून धक्कादायक माहिती समोर | पुढारी

Morbi bridge tragedy | १३५ जणांचा बळी गेला ती मोरबी पूल दुर्घटना कशामुळे घडली?, SIT अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील मोरबी दुर्घटनेबाबत (Morbi bridge tragedy) धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरात सरकारने गठित केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की केबलवरील सुमारे अर्ध्या तारा गंजल्या होत्या आणि जुने सस्पेंडर्स नवीन सस्पेंडर्सशी वेल्डिंग केले गेले. या काही प्रमुख दोषांमुळे मोरबी येथील पूल कोसळला. या दुर्घटनेत १३५ जणांचा मृत्यू झाला होता. हे निष्कर्ष डिसेंबर २०२२ मध्ये ५ सदस्यीय एसआयटीने सादर केलेल्या ‘मोरबी पूल दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालाचा’ भाग आहेत. हा अहवाल नुकताच गुजरातच्या नगरविकास विभागाने मोरबी नगरपालिकेला सादर केला आहे.

मच्छू नदीवरील ब्रिटीशकालीन झुलता पूल गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. या पुलाचे ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारी अजिंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) वर होती. या दुर्घटनेच्या तपासात एसआयटीला पुलाची दुरुस्ती, देखभाल आणि ऑपरेशनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एसआयटीमध्ये आयएएस अधिकारी राजकुमार बेनिवाल, आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी, राज्य रस्ते आणि इमारत विभागाचे सचिव आणि मुख्य अभियंते तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक यांचा समावेश आहे.

एसआयटीने नमूद केले आहे की, १८८७ मध्ये मच्छू नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन मुख्य केबल्सपैकी एका केबलला गंज लागला होता आणि पूल ३० ऑक्टोबरला संध्याकाळी कोसळ्यापूर्वी पुलाच्या सुमारे अर्ध्या तारा आधीच तुटलेल्या असाव्यात.

तारा गंजल्या होत्या

प्रत्येक केबल सात स्ट्रँड्सने तयार केली होती. प्रत्येकामध्ये सात स्टीलच्या तारांचा समावेश होता. ही केबल तयार करण्यासाठी एकूण ४९ तारा सात स्ट्रँडमध्ये एकत्र केल्या गेल्या होत्या, असे SIT च्या तापस अहवालात म्हटले आहे. “यात असेही निदर्शनास आले की ४९ तारांपैकी (केबलमधील) २२ तारा गंजल्या होत्या. यावरुन असे सूचित होते की त्या तारा दुर्घटनेपूर्वीच तुटल्या होत्या. उर्वरित २७ तारा हल्लीच तुटल्या होत्या,” असे एसआयटीने नमूद केले आहे.

एसआयटीला असेही आढळून आले की, नुतनीकरणाच्या कामादरम्यान, ”जुने सस्पेंडर्स (प्लॅटफॉर्मच्या डेकला केबलने जोडणारे स्टीलचे रॉड) नवीन सस्पेंडर्सशी वेल्डेड करण्यात आले होते. त्यामुळे सस्पेंडर्सचा समतोल बिघडला. अशा प्रकारच्या पुलांमध्ये भार सहन करण्यासाठी सिंगल रॉड सस्पेंडर्स असायला हवेत.”

विशेष म्हणजे मोरबी नगरपालिकेने जनरल बोर्डाच्या मान्यतेशिवाय पुलाची देखभाल व ऑपरेटचे कंत्राट ओरेवा ग्रुप (अजिंठा मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड) या कंपनीला दिले होते. त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी अथवा तपासणीशिवाय मार्च २०२२ मध्ये हा पूल नुतनीकरणासाठी बंद केला होता आणि २६ ऑक्टोबर रोजी तो खुला केला होता.

पूल क्षमतेपेक्षा अधिक भार सहन करू शकला नाही

एसआयटीच्या म्हणण्यानुसार, पूल कोसळण्याच्या वेळी पुलावर सुमारे ३०० लोक होते, जे पुलाच्या भार सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक होते. मात्र, प्रयोगशाळेच्या अहवालांवरून पुलाची नेमकी क्षमता किती आहे हे निश्चित होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या दुर्घटनेप्रकरणी मोरबी पोलिसांनी ओरेवा ग्रुपचे एमडी जयसुख पटेल यांच्यासह १० संशयित आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर आयपीसी कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. (Morbi bridge tragedy)

हे ही वाचा :

Back to top button