राजकोट : वृत्तसंस्था : मोरबी पूल दुर्घटनेत एका मुलाच्या रडण्यामुळे अवघ्या कुटुंबाचा जीव वाचला. नऊ वर्षांचा नेत्र रडला नसता तर अख्खे कुटुंब नदीत बुडाले असते.
अमरेली येथील सागर मेहता यांचे कुटुंबही दुर्घटनेपूर्वी काही मिनिटे आधी पुलावर होते; पण झुलता पूल गर्दीमुळे अधिकच झुलत असल्याने नेत्र घाबरला व धाय मोकलून 'मला भीती वाटते, इथून चला' असे रडू, ओरडू लागला. तो रडणे थांबवत नव्हता म्हणून सगळे कुटुंब पुलावरून खाली उतरले आणि पूल कोसळला… तत्पूर्वी, काढलेला सेल्फी माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय आहे, असे सागर मेहता सांगतात.
मोरबीचे तत्कालीन राजे प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर हे राजमहालातून दरबारापर्यंत या पुलाने जात असत. त्यांच्या काळातच पुलाची निर्मिती झाली. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर मोरबी नगरपालिकेवर या पुलाची जबाबदारी सोपविण्यात आली. लाकूड आणि तारेने बनविण्यात आलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. हा पूल एक पर्यटनस्थळ होते. त्यासाठी 15 रुपये तिकिट दरही आकारला जात असे. 1880 मध्ये 3 लाख 50 हजार रुपये खर्चून हा पूल बनविण्यात आला होता. पुलासाठीचे साहित्य तेव्हा ब्रिटनमधून मागविण्यात आले होते.