phone pay : फोन-पेवरून आता परदेशातही पेमेंट | पुढारी

phone pay : फोन-पेवरून आता परदेशातही पेमेंट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फिनटेक मेजर फोन-पे यूपीआयद्वारे आंतरराष्ट्रीय पेमेंट सुविधा सुरू होत आहे. भारतातील फोन-पे यूजर्स परदेशातील प्रवासादरम्यान यूपीआयच्या मदतीने परदेशातील विक्रेत्यांना पेमेंट करू शकतील. संयुक्त अरब अमिराती (यूएई), सिंगापूर, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान या देशांचा सध्या या सुविधेंतर्गत समावेश आहे. पुढे ही संख्या वाढवली जाईल. सुविधेचा लाभ घ्यायचा तर फोन-पे अ‍ॅपमध्ये इंटरनॅशनल अ‍ॅक्टिव्हेट करावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डच्या धर्तीवर यूजर्स थेट त्यांच्या भारतातील बँकेतून विदेशी चलनात पेमेंट करू शकतील. गेल्या 6 वर्षांत, आम्ही संपूर्ण भारतात यूपीआय पेमेंट क्रांती घडविली आहे. हाच अनुभव उर्वरित जगापर्यंत नेण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल आहे, असे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल चारी यांनी सांगितले.

काही इतर फिनटेक अ‍ॅप्सही येत्या काही महिन्यांत अन्य देशांत यूपीआय सेवा सुरू करू शकतात. यूपीआयअंतर्गत गेल्या महिन्यात 8 अब्जांहून अधिक व्यवहार झाले आहेत. चिनी कंपनी वुईचॅटपे आणि अलीपे देखील अनेक देशांमध्ये त्यांच्या ग्राहकांना अशीच सेवा देतात. भारतीयांना मात्र अशी सेवा देणारे हे पहिलेच अ‍ॅप आहे.

* फोन-पे, गुगल-पे, पेटीएम आणि सीआरडी-पे या 4 अ‍ॅप्सचा एकूण यूपीआय बाजारात 96.4% वाटा आहे.
* एकूण यूपीआय व्यवहारांपैकी सुमारे 49% व्यवहार फोन-पेवरून होतात.
* फोन-पेनंतर 34% शेअरसह गुगल पे दुसर्‍या स्थानी आहे. पेटीएमचा वाटा 11%, सीआरईडीचा वाटा 1.8% आहे. व्हॉटस् अ‍ॅप, मेझॉन पे आणि अन्य बँकिंग प्सचा मिळून 3.5% वाटा आहे.

Back to top button