महाराष्ट्रातील पुढील प्रत्येक निवडणूक ‘आप’ लढविणार | पुढारी

महाराष्ट्रातील पुढील प्रत्येक निवडणूक ‘आप’ लढविणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शाळा, वीज, पाणी, हॉस्पिटल, पायाभूत सुविधा, रोजगार या मूलभूत मुद्द्यांवर आम आदमी पार्टी (आप) काम करते. आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाही, असे मत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केले. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक ‘आप’ सर्व जागांवर लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये व्यापारी संबंध द़ृढ बनविण्याच्या उद्देशाने मान मुंबईत आले आहेत. आपचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सर्व शाळा चांगल्या चालल्या आहेत. ठिकठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू झाले आहेत. त्याची देशभर चर्चा आहे. पंजाबमध्येही ‘आप’चे सरकार आहे. आम्ही सर्व शाळा दर्जेदार बनविणार आहोत. पंजाबमध्ये शुक्रवारी 500 मोहल्ला क्लिनिकचे उद्घाटन केले जाणार आहे, असे मान यांनी सांगितले.

मान म्हणाले, यापूर्वी पंजाबमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे उद्योजक जायचे, त्यांच्याकडून पूर्वी गुंतवणुकीमध्ये हिस्सा मागितला जायचा. एक-दोन परिवारांना त्याचा फायदा व्हायचा; पण आता पंजाबमध्ये आपचे सरकार आले आहे. जनतेचे सरकार आले आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये उद्योगधंदे आल्यास त्याचा तीन कोटी जनतेला लाभ होईल. कोणालाही त्यात हिस्सा दिला जाणार नाही. सिंगल विंडो सरकार असेल. परवानगीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मुंबईतील बहुतांश उद्योजक पंजाबी आहेत. त्यांना आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची ही योग्य संधी आहे. त्यासाठी मी त्यांना भेटायला आलो आहे.

Back to top button