जी-20 परिषद तरुणाईसाठी सुवर्णसंधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

जी-20 परिषद तरुणाईसाठी सुवर्णसंधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी जी-20 परिषद भारतात होत असल्यामुळे ही देशातील तरुणाईसाठी सुवर्णसंधी आहे. तरुणाईने या परिषदेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे केले. ‘मन की बात’चा 95 वा भाग प्रसारित करण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील विणकर येल्दी हरिप्रसाद गरू यांचा विशेष उल्लेख केला. येल्दी हरिप्रसाद गरू यांनी हातांनी विणलेला जी-20 लोगो पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून पाठवला आहे. येल्दी यांना विणकामाचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला असून त्यांनी तो चांगल्यारीतीने सांभाळला आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेचा लोगो पाठवल्याबद्दल येल्दी यांचे आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले, पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लारा आणि कोलकाता येथील तुषार जगमोहन यांनी जी-20 संदर्भात भारताच्या प्रयत्नांचे खूप कौतुक केले आहे.

शांतता असो वा एकता, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा शाश्वत विकास असो, भारताकडे यासंबंधित आव्हानांवर उपाय आहेत. जी-20 मध्ये येणारे लोक आता प्रतिनिधी म्हणून येऊ शकतात. परंतु, ते भविष्यातील पर्यटकदेखील आहेत. येत्या काही दिवसांत जी-20 शी संबंधित अनेक कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित केले जाणार आहेत. या दरम्यान, जगातील विविध भागांतील लोकांना तुमच्या राज्यांना भेट देण्याची संधी मिळेल. मला खात्री आहे की, तुम्ही तुमच्या स्थानिक संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण रंग जगासमोर आणाल, असे पंतप्रधान म्हणाले.

अवकाश क्षेत्रात रचला इतिहास

18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अवकाश क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने विक्रम एस नामक आपले पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. याची रचना आणि तयारी भारताच्या खासगी क्षेत्राने केली होती. श्रीहरिकोटा येथून स्वदेशी स्पेस स्टार्ट अपच्या या पहिल्या रॉकेटने ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. भारतातील खासगी अवकाश क्षेत्रासाठी ही एका नवीन युगाची सुरुवात आहे, असे मोदी यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. याखेरीज त्यांनी भारतीय संगीत, देशाला लाभलेला संपन्न सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक जागृती, ड्रोनद्वारे केली जाणारी सफरचंदाची वाहतूक या विषयांवरही भाष्य केले.

Back to top button