पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या भारताच्या हालचालींना वेग? भारतीय लष्कर सज्ज | पुढारी

पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या भारताच्या हालचालींना वेग? भारतीय लष्कर सज्ज

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याच्या भारताच्या हालचालींना वेग आला आहे. भारत सरकारने आम्हाला आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही कोणत्याही क्षणी, कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईसाठी सज्ज आहोत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे.

काश्मीरला अधिक स्वायत्तता देणारे 370 हे कलम रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानने बेकायदा बळकावलेले व्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तानसह पूर्ववत ताब्यात घेण्यासाठी या हालचाली सुरू असून, भारतीय लष्कर त्यासाठी कोणत्याही क्षणी सज्ज असल्याचे ते म्हणाले. सरकारने आदेश दिल्यानंतर त्यासाठी तडकाफडकी कारवाई केली जाईल, असेही लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असून, भारत आणि पाकिस्तान सीमेदरम्यान यामुळे सतत तणावाचे वातावरण असते, असेही ते म्हणाले. गिलगिट, बाल्टिस्तान हे भारताचे सर्वात उत्तरेकडील भाग होत. काश्मीरचा मुझफ्फराबाद जिल्हा आदी भागही पाकच्या ताब्यात आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मीरवरून उद्भवलेल्या संघर्षात याच प्रदेशांवर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी ताबा मिळवला होता. या प्रदेशांवर भारताचा दावा कायम आहे, संरक्षणमंत्री सिंह यांचे संकेत भारतीय वायू दलाच्या 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात पूर्ववत आणण्याचे, त्यासाठी कारवाईचे संकेत दिले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून या भागातील नागरिकांवर अत्याचार सुरू आहेत आणि त्याचे परिणाम पाकला भोगावे लागतील. व्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून मिळविल्याशिवाय भारताची मोहीम पूर्ण होणार नाही, असेही संरक्षणमंत्री म्हणाले होते.

Back to top button