Gold Rates : सोन्याचे दर अचानक का पडले?; WGCनं सांगितलं कारण! | पुढारी

Gold Rates : सोन्याचे दर अचानक का पडले?; WGCनं सांगितलं कारण!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने (Gold Rates) विक्रमी स्तरावर म्हणजेच प्रति तोळा सुमारे ५६ हजार रुपयांवर पोहोचले होते. सध्याचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ हजारांनी कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ- उतार सुरुच आहे.

सोन्याच्या दरात गेल्या ऑगस्ट महिन्यात मोठी घसरण झाली होती. आशियाई बाजारांत ९ ऑगस्ट रोजीच्या व्यवहारादरम्यान केवळ १५ मिनिटांत सोन्याच्या दरात ४ टक्क्यांनी घसरण झाली होती. यामुळे सोने (Gold Rates) प्रति औंस १,७०० डॉलर पर्यंत खाली आले होते. सोन्याचे दर अचानक कमी होण्याचे कारण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) आपल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

६ ऑगस्ट रोजीच्या अमेरिकन रोजगाराच्या आकडेवारीवरुन अर्थव्यवस्थेबाबत चांगले संकेत मिळाले होते. यानंतर फेडरल रिझर्व्ह लवकरच आपले मदत पॅकेज मागे घेईल अशी अटकळ बांधण्यात आली होती. याच दरम्यान डॉलरचे मुल्य मजबूत स्थितीत आले होते. यामुळे सोन्याचे दर घसरल्याचे दिसून आले.

gold
gold file photo

सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर गेल्या ९ ऑगस्ट रोजी आशियाई बाजारांत तब्बल ४ अब्ज डॉलरहून अधिक सोन्याची विक्री झाली होती.

WGC म्हटले आहे की काही तांत्रिक बाबी देखील सोन्याच्या मोठ्या विक्रीचे कारण असू शकतात.

सोने ४७ हजारांवर…

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, काल ९ सप्टेंबर रोजी सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४७,१५९ रुपये होता. तर चांदी प्रति किलो ६४,०६७ रुपये होता.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : आयकर – तुम्हाला हवी असलेली A to Z माहिती | Income Tax Return – All You Need to Know

Back to top button