

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात (Gold Price Today) काही प्रमाणात घसरण झाली आहे. आज बुधवारी (दि.८) २४ कॅरेट सोन्याचा दर २०७ रुपयांनी स्वस्त होऊन तो ४७,१९२ रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) आला. पण चांदी किलोमागे ३७५ रुपयांनी महागली.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) बुधवारी ८ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,१९२ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,००३ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,२२८ रुपये, १८ कॅरेट ३५,३९४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,६०७ रुपये होता.
तर चांदीचा दर प्रतिकिलो ६४,५१० रुपयांवर पोहोचला आहे. हा दर सायंकाळपर्यंत बदलत राहतो.
शेअर बाजारातील तेजीचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांचा सोन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस दिसत नसल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्याचा दर प्रति औंस १,८०० डॉलर या महत्वाच्या स्तरापेक्षा खाली होता. प्रत्यक्षात हा दर प्रति औंस १,७९६ डॉलरवर होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात काही प्रमाणात तेजी दिसून येत असून दर प्रति औंस २४.३२ डॉलर होता. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.
दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.