आईन्स्टाईन, हॉकिंगपेक्षाही तीक्ष्ण बुद्धीची ८ वर्षांची मुलगी! | पुढारी

आईन्स्टाईन, हॉकिंगपेक्षाही तीक्ष्ण बुद्धीची ८ वर्षांची मुलगी!

मेक्सिको सिटी : अवघ्या आठ वर्षांच्या एका मेक्सिकन मुलीची बुद्धी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या संशोधकांपेक्षाही अधिक तीक्ष्ण आहे. तिचा ‘आयक्यू’ म्हणजेच बुद्ध्यांक या दोघांपेक्षाही दोन अंकांनी अधिक आहे. अधारा परेज नावाच्या या मुलीची आयक्यू लेव्हल टेस्ट घेतल्यावर तिचा आयक्यू 162 असल्याचे दिसून आले.

अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांचा अनुमानित आयक्यू 160 आहे. त्यांच्यापेक्षाही अधिक आयक्यू असलेली अधारा मेक्सिकोच्या लाहुआकमधील झोपडपट्टीत राहते हे विशेष! ती केवळ तीन वर्षांची होती त्यावेळी तिला ‘अ‍ॅस्पेर्जर्स सिंड्रोम’ असल्याचे निदान झाले होते.

अधाराची आई नेल्ली सांचेज यांनी सांगितले की अधाराला ती वेगळी असल्याने मुलं चिडवत असत. ती आपल्या काही मित्रांसह एका छोट्या घरात खेळत असताना त्यांनी तिला या घरात बंद करून ‘ऑडबॉल, विअर्डो’ म्हणून चिडवण्यास सुरुवात केली. त्यांनी या छोट्या घरावर दगडही मारण्यास सुरुवात केली.

अधारा डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिला शाळेत जाण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर आम्ही तिला एका मनोचिकित्सकांकडे घेऊन गेलो. त्यांनी अधाराला टॅलेंट केअर सेंटरमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तिथेच तिचा उच्च आयक्यू लेव्हल समजला! दुर्मीळ कौशल्य असलेल्या मुलांसाठीच्या शैक्षणिक ठिकाणी शिक्षण घेण्यास ती पात्र होती.

अधाराने केवळ आठ वर्षांच्या वयातच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. तिने आपल्या अनुभवांवर आधारित ‘डोन्ट गिव्ह अप’ नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे. मेक्सिकोतील सर्वात प्रभावशाली शंभर महिलांमध्ये या आठ वर्षांच्या मुलीचा समावेश झालेला आहे.

Back to top button