महाविकास आघाडी : त्रिपक्षांचे तारू नाराजीच्या खडकाकडे? | पुढारी

महाविकास आघाडी : त्रिपक्षांचे तारू नाराजीच्या खडकाकडे?

विश्लेषण - सुरेश पवार

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्षे होत आली आहेत. महाविकास आघाडी स्थापन होण्याआधी बर्‍याच नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आणि अखेर रडतखडत, रखडत घोड्यावर बसून आघाडी स्थापन झाली. वास्तविक काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तात्त्विक फरक जमीन-अस्मानाचा आहे. शिवसेनेचे कडवे हिंदुत्व काँग्रेसला कधीच मानवणारे नाही व नव्हते, तरीही आपद्धर्म म्हणून काँग्रेस पण या आघाडीत सामील झाला. मात्र, त्यांचे पुरेपूर मनोमीलन झाल्याचा दाखला गेल्या दीड-पावणेदोन वर्षात मिळालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी आपल्या पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विरोधातील तीव्र नाराजी उफाळून वर आली. बैठकीत 55 जणांनी मनोगत व्यक्त केले आणि त्यात बहुतांश भाग हा शिवसेना आणि काँग्रेसच्या पालकमंत्र्यांवर टीकेचा भडिमार करणारा होता. आपली कामे होत नसल्याचा संताप या वक्त्यांच्या मनोगतातून मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत असलेली संतप्त भावना या बैठकीमुळे प्रथमच बाहेर पडली, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी जवळजवळ वर्षभरापासून स्वबळाचा नारा लावीत महाविकास आघाडीविषयीची आपली कडवट मते व्यक्त केलीच आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यासंबंधी आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारखे मंत्री त्यांना साथ देत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांविरोधात शिवसेनेने काँग्रेस श्रेष्ठींकडेही तक्रारी केल्या आहेत आणि काँग्रेस श्रेष्ठींनी म्हणावी तेवढी गांभीर्याने दखल न घेतल्याने स्वबळाच्या उठाबशा सुरूच आहेत. किंबहुना काँग्रेस श्रेष्ठींचा स्वबळाला छुपा आशीर्वादच असावा, असेच नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यावरून म्हणता येते.

मित्रपक्ष असला, तरी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी आगपाखड केलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनीही काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाचा समाचार घेतला आहे. यातून त्रिपक्षातील बेदिली दिसून आली असली, तरी त्रिपक्षांच्या ज्येष्ठांनी प्रत्येक पक्षाला विस्ताराचा अधिकार असल्याची सारवासारव केली आहे आणि पॅचअप केले आहे.

महाविकास आघाडीची तीन चाकांची ही गाडी गेल्या पावणेदोन वर्षापासून अशा खाचखळग्यांतून वाटचाल करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोना आणि अतिवृष्टी, महापुराची आपत्ती आली आहे. आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध आघाड्यांवर त्रिपक्ष सरकारने काही चमकदार कामगिरी केली, असा दाखला नाही. त्रिपक्षात असलेली बेदिली वेळोवेळी उघड झालेली आहे आणि आता महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने स्वबळाच्या नार्‍यानुसार तिन्ही मित्रपक्ष आमने-सामने येतील, अशीच चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत जी खदखद व्यक्त झाली, ती या आगामी मिनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानेच झाली, हे स्पष्टच आहे. त्रिपक्षांचे हे तारू नाराजीच्या खडकाकडे निघाले आहे. या तारूचे तांडेल, सरतांडेल सुकाणू कसे हाताळतात, त्यावर या तारूचे भवितव्य अवलंबून आहे.

महाविकास आघाडीचे सूत्रधार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा विश्वास नेहमीच व्यक्त करीत असतात. त्यांचा हा विश्वास आणि नाराजीनाट्य यांच्यात कोणाची सरशी होईल, हे नजीकच्या काळात प्रत्ययाला येईल.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button