New Airbag Two Wheeler : एअरबॅग असलेली दुचाकी! जाणून घ्या कधी येणार बाजारात… | पुढारी

New Airbag Two Wheeler : एअरबॅग असलेली दुचाकी! जाणून घ्या कधी येणार बाजारात...

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रस्ते अपघातात जीव गमावणार्‍यांपैकी बहुतांश दुचाकी चालक असतात आणि हे लक्षात घेऊन होंडा मोटर्स ही दुचाकी उत्पादक कंपनी दुचाकींच्या सुरक्षेसाठी लवकरच एअरबॅग असलेली आपली स्कूटर पुढील वर्षी बाजारात आणणार आहे. या कंपनीने स्कूटरमधील या सुविधेचा पेटंट घेण्यासाठी अर्ज केला आहे. (New Airbag Two Wheeler)

हे पेटंट मिळाल्यानंतर होंडा आता कारमध्ये आढळणारे एअरबॅग फीचर आपल्या स्कूटरमध्येही देणार आहे. स्कूटरमधील एअर बॅग हँडलच्या मध्यभागी ठेवून ती स्कूटरच्या पुढील बाजूस बसवलेल्या एक्सेलेरोमीटरला जोडली जाईल. सध्याच्या कारमध्ये बसवलेल्या सिस्टीमपेक्षा हे वेगळे असेल. तथापि, ही यंत्रणा कारमध्ये आढळणार्‍या प्रणालीप्रमाणे काम करेल. कंपनी अनेक दिवसांपासून या प्रणालीची तयारी करत आहे. देशातील दहा टक्क्यांहून कमी कारमध्ये सहा एअरबॅग्जची सुविधा आहे. आता सर्व कारसाठी हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. (New Airbag Two Wheeler)

तथापि, दुचाकीमध्ये अशी सुविधा नव्हती. ती आता उपलब्ध होणार आहे. होंडाने 2009 मध्ये थायलंड आणि जपानमधून एअरबॅगची सुविधा असलेली स्कूटर लॉन्च केली होती. आता ही स्कूटर कंपनी 2023 मध्ये भारतात लॉन्च करू शकते. भारतातील दुचाकीमध्ये अशी सुविधा आणणारी ही पहिली कंपनी असेल.

…असे चालते एअर बॅगचे कार्य

एअर बॅग म्हणजे वाहनाच्या समोरील भागात बसवलेली पिशवी असते. त्यात शक्तिशाली सेन्सर्स बसवले जातात. अपघातावेळी वाहन एखाद्या वस्तूवर किंवा भिंतीवर आदळल्यास प्रवासी पुढे आदळतात. तथापि, सेन्सरच्या मदतीने काही क्षणांतच ही पिशवी फुलते आणि त्यामुळे वाहन धडकण्याचा वेग विलक्षण मंदावतो. परिणामी, अपघातात होणारी इजा कमी करण्याकामी एअर बॅग मोलाची भूमिका बजावते.

हेही वाचा

Back to top button