पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे टोलेजंग इमारतींच्या छोट्याशा आवारात हातांनी मातीचे किल्ले साकारण्याऐवजी बाजारात तयार मिळत असलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे किल्ले आणून ते सजवण्याकडे कल वाढू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारात दिसू लागलेल्या या तयार किल्ल्यांना यंदाच्या दिवाळीतही मोठी मागणी आहे.
परीक्षा संपल्यानंतर दिवाळीची सुट्टी सुरू होताच दगड, माती, मावळे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती यांची जमवाजमव करणारी शाळकरी मुले आता दिसेनाशी झाली आहेत. पूर्वी मित्रांच्या घोळक्याने एकत्र येऊन माती आणायची आणि मातीचे लिंपण करून मेहनतीने साकारलेला किल्ला सजवायचा. दिवाळीत किल्ल्यावर पणत्यांची आरास केली जात असे. हा आनंद आताच्या पिढीसाठी दुर्मीळ झाला आहे. आता साच्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून तयार केलेले रंगीबेरंगी किल्ले बाजारात दिसू लागले आहेत.
मातीचे किल्ले विसरले जात असून बाजारात मिळणार्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तयार किल्ल्यांची मागणी वाढू लागली आहे. रायगड, प्रतापगड असे तयार किल्ले खरेदी करण्याकडे पालक आणि लहान मुलांचा कल वाढला आहे. लहान आकाराच्या साध्या किल्ल्यांची किंमती 500 रुपयांपासून पुढे आहे. तर मोठ्या रंगीबेरंगी किल्ल्यांची किंमत 1500 रुपयांपर्यंत आहे. काही इमारतींत मातीमुळे परिसर खराब होतो म्हणून रेडिमेड किल्ले खरेदी केले जात आहेत.
किल्ले जरी रेडिमेड असले तरी मावळे अद्यापही मातीपासून तयार केलेले आहेत. यामध्ये सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, भाला हातात घेतलेले मावळे, गवळणी, भालदार – चोपदार, रणगाडे अशा प्रतिकृती आहेत.