सावधान! हॅकिंग व्हायरसच्या नव्या व्हर्जनने भारतात आता मोठा धोका | पुढारी

सावधान! हॅकिंग व्हायरसच्या नव्या व्हर्जनने भारतात आता मोठा धोका

नवी दिल्ली : देशातील मोबाइल बँकिंग यंत्रणेला ‘सोव्हा अँड्रॉईड ट्रोझन व्हायरस’चा धोका उद्भवला आहे. ब्लॅक मार्केट आणि इंटरनेटच्या डार्क वर्ल्डवर हा व्हायरस विक्रीला आहे. या व्हायरसमुळे कोणत्याही मोबाईल बँकिंग यंत्रणेतील यूझर नेम आणि पासवर्ड केव्हाही हॅक केला जाऊ शकतो. व्हायरस एकदा का मोबाईलमध्ये शिरला की तो डिलिट करता येत नाही. मारिच राक्षसाप्रमाणे त्याला रूप बदलता येते. मोबाईलमधील अन्य अ‍ॅपचे रूपही हा व्हायरस धारण करू शकतो. ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने (आयसीईआरटी) राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गृह मंत्रालयाला या धोक्याचा इशारा दिला आहे. ब्लॅक मार्केटमध्ये व्हायरस विक्रीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची डिजिटल मूव्हमेंट ‘आयसीईआरटी’ने टिपली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • मारिच राक्षसाप्रमाणे नवे रूप धारण करतो व्हायरस
  • भामट्यांची डिजिटल चाल आयसीईआरटीने
  • टिपली केंद्रीय गृह मंत्रालयाकडून खातेदारांना सतर्कतेचा इशारा

असा करा बचाव

  • फिशिंग वा एसएमएसच्या माध्यमातून हा व्हायरस तुमच्या मोबाईलपर्यंत येतो. त्यामुळे अ‍ॅप अपडेट करण्यासाठी आलेल्या मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नये.
  • प्ले स्टोअरच्या माध्यमातूनच अ‍ॅप अपडेट करावेत. सोव्हा अँड्रॉईड ट्रोझन व्हायरस बनावट अँड्रॉईड अ‍ॅपच्या माध्यमातूनही पाठवला जाणे शक्य आहे. सतर्क राहावे.

पासवर्डही बदलावा

अनेक जण दीर्घकाळ पासवर्ड बदलत नाहीत. भारतात तर हा अनुभव बहुतांशी आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅपचा पिन एकदा सेट केला की तो कुणी बदलतच नाही. धोका त्यामुळे अधिक आहे.

असे काम करतो व्हायरस

फोनचे की-स्ट्रोक्स, कुकीजमध्ये शिरतो. कॅमेर्‍याद्वारे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ-ऑडिओ तयार करून कमांड सेंटरला पाठवतो. स्क्रीन लॉक, स्वाईप, पॅटर्न लॉक किंवा पिन लॉकची माहिती लांबवतो आणि पुरवतो. मोबाईल बँकिंगचे यूझर नेम आणि पासवर्ड लांबवितो.

Back to top button