व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात ९१.५० रुपयांची कपात | पुढारी

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात ९१.५० रुपयांची कपात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ९१.५० रुपयांची कपात केली आहे. दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. दर महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे दर निर्धारित केले जातात.

गेल्या काही काळात जागतिक बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. या कपातीनंतर १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दिल्लीतील दर १८८५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कोलकाता येथे हे दर १९९५.५ रुपये तर मुंबईत १८४४ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याआधी आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. दुसरीकडे गत जुलै महिन्यापासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. इंडेनच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दिल्लीतील दर १०५३ रुपयांवर असून कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये हेच दर क्रमशः १०७९ रुपये, १०५२ आणि १०६८ रुपयांवर आहेत.

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात सलग पाचव्यांदा कपात झाली आहे, हे विशेष. जागतिक बाजारात इंधनाचे दर उसळल्यानंतर गत मे महिन्यात या गॅस सिलेंडरचे दर २३५४ रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले होते. मात्र त्यानंतर दरात सातत्याने कपात झााली आहे. या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर ४५० रुपयांनी कमी झाले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button