एकाच सुईने ‘टॅटू’ गोंदवणे पडले महागात | पुढारी

एकाच सुईने ‘टॅटू’ गोंदवणे पडले महागात

वाराणसी; वृत्तसंस्था : गेल्या अनेक वर्षांपासून तरुण आणि तरुणींमध्ये शरीरावर ‘टॅटू’ गोंदवून घेण्याची प्रचंड क्रेझ आहे, पण फॅशनच्या नावाखाली ‘टॅटू’ गोंदवणे काहीवेळा महागात पडू शकते. वाराणसीमध्ये एकाच सुईने ‘टॅटू’ गोंदवून घेतल्याने 14 जणाना एचआयव्हीची लागण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

वाराणसीतील सुमारे 14 जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्याची पडताळणी करण्यात आली. ‘टॅटू’साठी एकच सुई वापरल्याने हा संसर्ग झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सर्व बाधितांवर वाराणसीतील जिल्हा रुग्णालयातील अँटी रेट्रो व्हायरल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. एकाच सुईने ‘टॅटू’ बनवल्याने एचआयव्हीची बाधा झाली असल्याचे 90 टक्के शक्यता असल्याचे मत डॉ. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ‘टॅटू’ काढण्यासाठी वापरली जाणारी सुई खूपच महाग असते. यात्राकाळात पैसे वाचवण्यासाठी ‘टॅटू’ काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही असेल आणि त्याने ‘टॅटू’ काढून घेतला असेल तर अन्य लोकांना एचआयव्हीचा संसर्ग होतो. त्यामुळे ‘टॅटू’ काढताना सुई आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button