खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त | पुढारी

खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : सध्या जीवनावश्यक वस्तू, अन्‍नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस होरपळून निघालेला असताना खाद्यतेलाच्या दरात मात्र या महिनाभरात मोठी घट झालेली दिसून येत आहे. खाद्यतेलांच्या 15 किलोच्या डब्यामागे 200 ते 300 रुपयांनी घट झाली असून किरकोळ बाजारात एक लिटर तेलाची पिशवी 20 ते 30 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याप्प्प्याने वाढ होत गेली. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आवक कमी झाली. त्यानंतर इंडोनेशिया, मलेशियात पामतेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेथील स्थानिक बाजारात पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला.
दक्षिण अमेरिकेतील देशांतील हवामान बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाल्याने भारतात सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. जागतिक बाजारपेठेतील या घडामोडींमुळे पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती.

तेलाची आवक करणार्‍या काही देशांनी पामतेल निर्यातीवर निर्बंध घातले असून त्याचाच परिणाम म्हणून भारतात तेलाचे दर वाढले होते. मात्र जागतिक बाजारपेठेतून गेल्या महिनाभरापासून खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सूर्यफूल, सोयाबीन, पामतेलाच्या दरात घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर खाद्यतेलाचे दर अवलंबून असतात. खाद्यतेलांचा पुरवठा सुरळीत झाला आहे.

Back to top button