खिद्रापूर मंदिर दुरुस्तीवरून ‘एमएसआरडीसी’ विरुद्ध पुरातत्त्व विभागामध्ये जुंपली! | पुढारी

खिद्रापूर मंदिर दुरुस्तीवरून ‘एमएसआरडीसी’ विरुद्ध पुरातत्त्व विभागामध्ये जुंपली!

कुरूंदवाड : जमीर पठाण : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराची दुरुस्ती आणि संवर्धन आता पुरातत्त्व खात्याऐवजी रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असल्याचा दावा ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केला आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय ‘एमएसआरडीसी’ला हे काम करता येणार नाही, असे पुरातत्त्व विभागाने बजावल्याने या मंदिराची दुरुस्ती रखडणार काय? यंदाही महापूर आल्यास मंदिराच्या सुरक्षेचे काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मंदिरांच्या जतन-संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाचे आहे. पुरातन मंदिरांच्या संवर्धनाचे काम करणारी तज्ज्ञ कारागीर मंडळी आहेत. हे काम वेळखाऊ असून, ते बारकाईने करावे लागते. अगोदरच रस्त्यांच्या कामात व्यस्त असलेल्या रस्ते विकास महामंडळाला संवर्धनासाठी त्या पद्धतीचे तज्ज्ञ कारागीर मिळणार का? असा सवाल इतिहास अभ्यासकांनी केला आहे.

मंदिरांच्या संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाकडून होणे गरजेचे असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी राज्य सरकारला सांगितले आहे. तरीदेखील राज्य सरकारने सर्वेक्षणाची जबाबदारी महामंडळावर सोपवून पहिल्या टप्प्यातील कामाकरिता 101 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, संवर्धनाच्या कामात महामंडळाला कितपत यश येणार, हे कामाला सुरुवात झाल्यानंतर समजणार आहे.

रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प संचालकांची नियुक्ती केली असून, तसा अहवाल लवकरच तयार होणार आहे

खिद्रापूर मंदिर हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पुरातत्त्व विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या समन्वयातून या मंदिराचे संवर्धन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने नेमलेल्या समितीमध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
– चंद्रकांत पुलकुंडवार, सहव्यवस्थापकीय संचालक, रस्ते विकास महामंडळ

Back to top button