कर्नाटकात २ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन | पुढारी

कर्नाटकात २ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यातील लॉकडाऊन २४ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ७) कॅबिनेटच्या बैठकीनंतर घोषणा केली. यावेळी राज्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. यावेळी हा लॉकडाऊन सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता सुरू होणार असून तो २५ मे पर्यंत राहील.

अधिक वाचा : जनता कर्फ्यू १२ मे पर्यंत कायम राहणार

कर्नाटकात गुरुवारी कोरोनाबाधितांचे ४९,०५८ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून आतापर्यंत बाधितांची संख्या ही १७,९०,१०४ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाने ३२८ लोकांचा बळी गेला असून राज्याता मृत्यूचा आकडा हा १७,२१२ झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. एकट्या बंगळूर शहरातच २३,७०६ बाधीतांचा नोंद झाली असून १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात सध्या ५,१७,०७५ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात २४ तासांत १८,९४३ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत १२,५५,७९७ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर गुरुवारी राज्यात १,६४,४४१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत २.६५ कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट दिवसात १६०४ नवे रुग्ण

राज्यात वाढणाऱ्या कोरोनावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, जर लोक सहकार्य करत नसतील तर कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. तर राज्यात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर चिंता व्यक्त करताना, लोक ‘जनता कर्फ्यू’चे पालन करताना दिसत नाहीत. ते आमचा इशारा गांभीर्याने घेत नाहीत. म्हणूनच लॉकडाऊन लावावे लागत आहे. 

तसेच जर नागरिकांना शासनाने कडक पावले उचलू नयेत असे वाटत असेल तर त्यांनी मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील ऑक्सिजन संकटाच्या संदर्भात बोलताना, हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर रूग्णाला बेड मिळाला नसल्याने काल नातेवाईकांनी त्याच्यासह मुख्यमंत्री निवास आणि विधानसौंध गाठल्याच्या प्रश्न करताच, हे योग्य नाही आणि लोकांनी असे करणे थांबवावे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी म्हटले आहे.

Back to top button