२ ते १८ वयोगटातील बालकांना मिळणार लस | पुढारी

२ ते १८ वयोगटातील बालकांना मिळणार लस

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून या लाटेत बालकांवरही कोरोना हल्ला करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २ ते १८ वयोगटातील बालकांच्या लसीच्या ट्रायलला सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने (एसईसी) मंजुरी दिली आहे. कोव्हॅक्सीन लस बनवीत असलेल्या भारत बायोटेक कंपनीकडून बालकांसाठीची ही लस विकसित केली जात आहे. 

अधिक वाचा : इंधनाचे दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर

बालकांसाठीच्या या लसीचे ट्रायल ५२५ लोकांवर केले जाणार आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स, पाटणा एम्स, नागपूर येथील एमआयएमएस रुग्णालयात हे ट्रायल होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु करण्यापूर्वी भारत बायोटेकला दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण डेटा सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी म्हणजे तज्ज्ञांच्या समितीला सादर करावा लागणार आहे. भारतात सध्या ज्या दोन लसी विकसित करण्यात आलेल्या आहेत, त्या केवळ १८ वर्षे वयावरील लोकांना दिल्या जाऊ शकतात. सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोविशील्ड व भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सीन या त्या दोन लसी आहेत.

अधिक वाचा : इंग्लंडने पंचसूत्रीने थोपवली कोरोनाची दुसरी लाट 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात हाहाकार उडविलेला आहे. पहिल्या लाटेचा फटका विशेषत्वाने वृद्ध लोकांना बसला होता, मात्र दुसऱ्या लाटेत वृध्दांसोबत तरुण पिढी कोरोना कचाट्यात सापडली आहे. कोरोना विषाणू आपले स्वरूप वारंवार बदलत असून तिसरी लाट आली तर लहान बालकेदेखील कोरोना संसर्गातून सुटू शकणार नाहीत, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. त्याचमुळे लहान बालकांवर लागू पडणारी लस तयार करणे आवश्यक बनले आहे. सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनीच तिसरी लाट येणे अटळ असून त्याचा बालकांवर सर्वात जास्त प्रभाव पडू शकतो, असा धोक्याचा इशारा दिलेला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. तिसरी लाट आली तर बालकांचे काय होणार, त्यांच्या कुटुंबियांचे काय होणार, उपचार कशा पद्धतीने होणार आदी गोष्टींचा विचार करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

Back to top button