डेक्कन क्वीनचा 95 वा वाढदिवस जल्लोषात

डेक्कन क्वीनचा 95 वा वाढदिवस जल्लोषात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विविध प्रकारचे रंगबेरंगी फुगे… झेंडूच्या फुलांच्या माळा… वेळ सकाळी सातची… इतक्यात जोरदार भोंगा वाजला…. आणि मेगा ब्लॉकमुळे रद्द असतानाही डेक्कन क्वीन यार्डातून केक कापण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आली, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणार्‍या चाकरमान्यांना दररोज घेऊन जाणार्‍या आणि पुण्यात आणणार्‍या डेक्कन क्वीन रेल्वे गाडीचा शनिवारी (दि. 1) 95 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे रेल्वे स्थानकावर हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

या वेळी बाबा मगर, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा व अन्य प्रवासीवर्ग उपस्थित होता. शनिवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी डेक्कन क्वीन रद्द असतानाही यार्डातून प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर वाढदिवस साजरा करण्यासाठी आली. याकरिता रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी विशेष सहकार्य केले.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह म्हणाल्या, दी ग्रेट इंडिया पॅनासुलर रेल्वे (जीआयटीआर) यांनी दि 1 जून 1930 रोजी 'पुणे-मुंबई-पुणे' या मार्गावर इलेक्ट्रिक, हायस्पीड, कंफर्ट, लक्झरी, डिलक्स सुविधांनी परिपूर्ण अशी 'डेक्कन क्वीन' ही रेल्वे गाडी सुरू केली. ती आता मध्य रेल्वे अंतर्गत सुरू आहे. ही जगातील एकमेव ट्रेन आहे, जिचा वाढदिवस साजरा होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच अगदी मी पाच वर्षांची असल्यापासून वाढदिवस साजरा करते. डेक्कन क्वीनचा वाढदिवस हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news