पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर विभूतींच्या पत्नी निकिता झाल्या लेफ्टनंट | पुढारी

पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर विभूतींच्या पत्नी निकिता झाल्या लेफ्टनंट

चेन्‍नई ; पुढारी ऑनलाईन: पतीने देशासाठी बलिदान दिले. अशावेळी त्‍यांनी मोठ्या धैर्याने डोंगराएवढे दु:ख पचवले. त्‍याचबरोबर पतीच्‍या देशसेवेच्‍या आदर्शावर वाटचाल करत स्‍वत:ही भारतीय सैन्‍यदलात लेफ्‍टनंटपदी नियुक्‍त झाल्‍या. या वीरपत्‍नीचे नाव आहे निकिता ढौंढियाल- कौल. चैन्‍नई येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर आज त्‍यांची भारतीय सैन्‍यदलात लेफ्‍टनंटपदी नियुक्‍ती करण्‍यात आली. 

डेहरादून येथील मेजर विभूती ढौंढियाल यांचा निकिता कौल यांच्‍यासोबत १८ एप्रिल २०१८ रोजी विवाह झाला होता. यानंतर अवघ्‍या १० महिन्‍यांनंतर २०१९मध्‍ये पुलवामा येथील दहशतवादी हल्‍ल्‍यात मेजर विभूती शहीद झाले. या दु:खाला धैर्याने सामोरे जात निकिता सावरल्‍या.त्‍यांनी भारतीय सैन्‍यदलात अधिकारी होण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. देशसेवा करण्‍याचे पतीचे अपुरे राहिलेले स्‍वप्‍न साकारणे हेच माझे ध्‍येय आहे. भारतीय सैन्‍यदलात अधिकारी होवून मी त्‍यांना श्रद्धांजली देईन, असा निर्धार त्‍यांनी केला. 

अधिक वाचा:  कोरोना : सलग दुसर्‍या दिवशी रुग्‍णसंख्‍येत घट 

सैन्‍यदलात सेवा बजाविण्‍यासाठी त्‍यांनी ‘एसएससी’ परीक्षा दिली. यामध्‍ये त्‍या उर्त्तीण झाल्‍या. यानंतर चेन्‍नई येथील अधिकारी प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये त्‍यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. अखेर आज त्‍यांची लेप्‍टनंटपदी नियुक्‍ती झाली. मेजर विभूती ढौंढियाल यांच्‍या वीरतेचा मरणोत्तर शौर्यचक्र देवून गौरवही करण्‍यात आला आहे.त्‍यांच्‍या पत्‍नी निकिता यांनी भारतीय सैन्‍यदलात सेवा बजावण्‍यासाठी रुजू झाल्‍या आहेत. आम्‍हाला याचा अभिमान वाटतो, असे ट्‍वीट सैन्‍यदलाने केले आहे. 
अधिक वाचा: पश्चिम बंगाल : बैठकीला उशिरा आल्याने मुख्य सचिवांची तडकाफडकी बदली

Back to top button