राजस्‍थान : गहलोत विरुद्‍ध पायलट संघर्ष सुरुच | पुढारी

राजस्‍थान : गहलोत विरुद्‍ध पायलट संघर्ष सुरुच

जयपूर; पुढारी ऑनलाईन: राजस्‍थानमध्‍ये मुख्‍यमंत्री अशोक गहलोत विरुद्‍ध माजी उपमुख्‍यमंत्री सचिन पायलट यांच्‍यातील राजकीय संघर्ष सुरुच राहिला आहे. राजस्‍थान प्रभारी अजय माकन यांनी लवकरच मंत्रीमंडळ विस्‍तार होईल, अशी ग्‍वाही सचिन पायलट यांनी दिली होती. त्‍यांची नाराजी दूर झाली, असे मानले जात असतानाच गहलोत समर्थक भडकले आहेत. आता अपक्ष आणि बहुजन समाज पार्टीतून काँग्रेसमध्‍ये आलेल्‍या आमदारांची २३ जून रोजी बैठक बोलविण्‍यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींवर दबाव टाकण्‍यासाठीच ही बैठक घेण्‍यात येत असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

अधिक वाचा : अभिनेत्रीवर बलात्‍कार; तामिळनाडूतील माजी मंत्री अटकेत 

१३ अपक्ष आमदार आणि बसपातून काँग्रेसमध्‍ये  आलेल्‍या सहा आमदारांची बैठक २३ जून रोजी अशोका हॉटेलमध्‍ये होणार आहे. सचिन पायलट यांना महत्त्‍व दिले जात आहे. यामुळे अस्‍वस्‍थ झालेला गहलोट गटाने त्‍यांच्‍याविरोधात रणनीती तयार केली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्‍तार, सध्‍याची राजकीय वातावरण आणि राजकीय नियुक्‍त्‍यांवर चर्चा होईल. या  सर्व आमदारांनी सचिन पायलट यांच्‍याविरोधात  भूमिका घेतली आहे. 

अधिक वाचा : ‘कोरोनामुक्‍त’चा टक्‍का पाेहचला ९६.२७वर

सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्‍यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी त्‍यांना महासचिव पदाची ऑफर दिली होती. मात्र मुख्‍यमंत्रीपदासाठी आग्रही असणार्‍या पायलट यांनी ती नाकारली. सध्‍या रिक्‍त असणार्‍या सहा  मंत्रीपदावर आपल्‍याच समर्थक आमदारांची वर्णी लागावी, यासाठी पायलट आग्रही आहेत. तर १३ अपक्ष व बसपातून काँग्रेसमध्‍ये प्रवेश केलेल्‍या आमदरांचीही याच मंत्रीपदावर नजर आहे. यामुळे आता त्‍यांना समोर करुन गहलोत गटाकडून सचिन पायलट यांच्‍यावर दबाव  आणला जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

अधिक वाचा :​​​​​​​ आपला आधार क्रमांक दुसऱ्याला माहीत झाल्यास बँक खाते हॅक होऊ शकते का?

 

Back to top button