स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड

File photo
File photo

[author title="भगवान चिले" image="http://"][/author] (किल्ले अभ्यासक )

छत्रपती शिवाजी महाराजांंनी मोठ्या दूरद़ृष्टीने स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली. यासंदर्भात बखरकार सभासद लिहितो, 'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोटका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखने बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले तक्तास गड हाच करावा.'

शिवरांयानी राजधानी म्हणून किल्ले रायगड का निवडला, याची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1. स्वराज्यावर चालून आलेले आदिलशाही किंवा मोगली शत्रू आपला अफाट सेनासागर घेऊन प्रथम राजधानीत राजगडाच्या दिशेने नेहमी येत. कारण, स्वराज्याचा प्राण असलेले शिवाजी महाराज आपल्या कुटुंब कबिल्यासह राजगडावरच राहत असत. शाहिस्तेखानच्या स्वारीवेळी शिवरायांना याचा अनुभव आला होता.
2. राजगड किल्ला देशावर असल्यामुळे शत्रू सैन्यास आपले घोडदळ, पायदळ, अजस्र तोफखाना घेऊन राजगडाचा पायथा गाठणे शक्य असे. शिवाय या सैन्यास लागणारी रसद पुरविणेही शत्रू सैन्यास सहजसाध्य होत असे.
3. किल्ले राजगड भोवतालच्या मावळातील सर्वच वतनदारांचे स्वराज्यावर प्रेम होते असे नव्हते.
4. स्वराज्याच्या प्रारंभी अनेक आपत्तींना तोंड देत-देत स्वराज्य हळूहळू आकारास येत होते. त्यामुळे मुलकी कारभारासाठी अफाट पसार्‍याचा पण चिंचोळा माथा असलेला राजगड व्यवस्थित उपयोगात येत होता; पण पुढे जसजसे स्वराज्य वेगाने वाढू लागले तसतशी राजगडच्या माध्यावरील जागा प्रशासकीय कामासाठी अपुरी पडू लागली.
5) पश्चिम घाटातून एखादी पाचर मारल्यासारखी भासणारा रायगड सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर नाही, तर तो सह्याद्रीपासून थोडा सुटावलेल्या बलदंड डोंगर माथ्यावर उभा आहे. त्याच्या तीन बाजूंनी अजस्र कडे व भयाण दर्‍यांमुळे त्याच्यावर चढणे शत्रूला अशक्य होते. त्याच्या चौथ्या बाजूवर भक्कम तटबंदी, मोक्याच्या ठिकाणी बुरूज व त्यात नाणे दरवाजा, चित दरवाजा, बलदंड असा महादरवाजा बांधून शिवरायांनी रायगड 'या सम हा' असा बेलाग बनवला होता.
6. समुद्रसपाटीपासून 882 मीटर उंचीवर असलेला रायगड मैदानी आक्रमकांच्या टप्प्याच्या पलीकडे सह्याद्रीच्या आडोशाला कोकणात एकाकी अशा डोंगरावर उभारलेला आहे. सह्याद्रीची 1000 मीटर उंच भिंत ओलांडल्याशिवाय किल्ले रायगडास वेढा घालणे शत्रूला शक्य नव्हते. रायगडाच्या परिसरातील काळ नदीच्या पात्रामुळे या गडास नैसर्गिक खंदकाचे कवच लाभलेले होते.
7. रायगडाच्या माथ्यावरील सपाटीमुळे शिवरायांना राज्याभिषेकानंतर प्रशासकीय कामासाठी शेकडो इमारती बांधणे शक्य झाले. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी किल्ले रायगडावर इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन आला होता. तो त्याच्या डायरीत लिहितो, '21 मे 1674 रोजी आम्ही गडावर आलो. गड फितुरीखेरीज अभेद्य असून वर राजमहाल, दरबार, प्रधानांची घरे मिळून सुमारे 300 इमारती आहेत.'
8. रायगडावर राजधानी करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, गडावरील मुबलक पाणी. गडावर प्रचंड मोठे असे गंगासागर, हत्ती, कुशावर्त, कोळिंब असे तलाव होते. शिवकाळात गडावरील ही जलसंपत्ती निगुतीने जतन करत असत. आज आपण पाहतो की, गडपायथ्याच्या पाचाड गावात बर्‍याचदा पाण्याचा दुष्काळ असतो. पण, गडमाथ्यावर मात्र कधीही पाणी संपले असे होत नाही.
9. नवनिर्मित स्वराज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी पश्चिम किनार्‍यावरील व्यापारावर पकड ठेवणे गरजेचे होते. यासाठी शिवरायांनी आरमार उभारले.

बेटावरील जलदुर्ग, किनारीदुर्ग उभारले; पण या सागरावरील विस्तारास जंजिर्‍याच्या सिद्दीने वेळोवेळी खोडा घातला. शिवरायांनी 1657 पासून 1678 पर्यंत किमान सहा वेळा जंजिरा घेण्याच्या आटोकाट प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी जंजिर्‍याच्या उरावर पद्मदुर्ग व जंजिर्‍याच्या समुद्र किनार्‍यावर लक्ष ठेवणारा सामराजगड बांधून सिद्दीच्या हालचालीस बर्‍यापैकी पायबंद घातला. रायगडावरून शिवरायांना सिद्दीवर लक्ष ठेवणे सोपे होते. तेथून ते वेळोवेळी हेरांकरवी सिद्दीची हालचाल टिपत होते. त्यांचे रायगडावरून सिद्दीकडे कसे डोळ्यात तेल घालून लक्ष होते, यासाठी एक उदाहरण देतो, 11 फेब्रुवारी 1671 या दिवशी जंजिर्‍याच्या सिद्दी कासम अंधाराचा फायदा घेऊन सामराजगडाच्या पायथ्यासी आला. यावेळी गडावरील शिबंदी होळीच्या रंगात बेसावध होती. अचानक सिद्दीने हल्ला केला व या झटापटीत त्याने चाणाक्षपणे सामराजगडावरील दारू कोठार उडवून दिले. यात अनेक मराठ्यांचा मृत्यू झाला व मुरुडची किनारपट्टी स्फोटाच्या आवाजाने दणाणून गेली. यावेळी रायगडावर आपल्या राजमहालात झोपलेले शिवराय त्या आवाजाने झोपेतून दचकून जागे झाले. त्यांनी ताबडतोब रायगडावरून जासुदांना दंडा राजपुरीकडे रवाना केले. जासुदांनी मध्यरात्री घोडदौड करून रायगडावर खबर आणली, सामराजगड सिद्दीने घेतला. अशा प्रकारे शिवरायांना राजधानीच्या रायगडावरून कोकण किनारपट्टीवरील सिद्दीवर लक्ष ठेवणे शक्य झाले.

10. स्वराज्याचे आरमार, बंदरे, घाट, परकीय मालाची आयात-निर्यात यावर नियंत्रण ठेवण्यास त्यावेळच्या स्वराज्याच्या केंद्रभागी कोकणात किल्ले रायगड होता. राजधानी रायगडापासून महाड येथील मध्यम बंदरावरून शिवरायांना सागरावर त्वरित हालचाल करणे शक्य होेते. अशा अनेक कारणांमुळे शिवरायांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या शेकडो किल्ल्यांपैकी दुर्गदुर्गेश्वर रायगडास राजधानीचा मान दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news