मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करा : खासदार कीर्तिकर यांची मागणी | पुढारी

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करा : खासदार कीर्तिकर यांची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे तसेच गोरेगाव- बोरिवली हार्बर लाईनचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वेच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी केली. मुंबईकर जनतेसाठी रेल्वे ही जीवनरेखा मानण्यात येते. मात्र प्रवाशांना व रेल्वे लगतच्या झोपडपट्टीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करावी, असेही कीर्तिकर यांनी नमूद केले.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेतील २३ पात्र झोपडपट्टीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही, ते तातडीने करण्यात यावे. इंदिरा नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथील १२० पैकी ११४ पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले, परंतु ६ नागरिकांचे पुनर्वसन झालेले नाही. आंबोली पादचारी पुलालगत ३५ पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. आंबेडकर नगर, सोनावाला कंपाऊंड रोड येथील ६० पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. या सर्व पात्र बाधीतांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जोगेश्वरी येथे पश्चिम रेल्वेच्या मालकीचा ७० एकरचा भूखंड आहे, यावर टर्मिनस बांधण्यात यावे, ज्यामुळे अंधेरी ते बोरिवली प्रवाशांची मोठी सोय होईल, असे किर्तीकर यांनी चर्चेत सहभाग घेताना सांगितले.

Back to top button