यवतमाळ : गारपीटीसह अवकाळी पाऊस; फळबागांचे नुकसान | पुढारी

यवतमाळ : गारपीटीसह अवकाळी पाऊस; फळबागांचे नुकसान

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याला अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाज खरा ठरला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मंगळवार व बुधवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. बाभूळगावमध्ये तुरीच्या दाण्याच्या आकाराच्या गाराही कोसळल्या. जवळपास २० मिनिटे वादळ व पाऊस बरसत होता. या प्रमाणेच कळंब, उमरखेड, पुसद, आर्णी, महागाव या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.
दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी प्रचंड उकाडा जाणवत होता. दोन दिवसांपासून वारा जोरात वाहू लागल्याने पाऊस येणार आहे याचे संकेत मिळाले होते. वादळासोबत आलेल्या पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. यवतमाळ शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अशीच स्थिती कळंब तालुक्यातील होती. तेथेही वीज पुरवठा बंद पडला होता.मार्चनंतर एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम आहे. एकीकडे तापमान झपाट्याने वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत तापमानामध्ये सरासरी ४ अंशाची वाढ झाली आहे. पारा ४२ अंशापर्यंत पोहोचला होता. अशात अवकाळी पाऊस काही क्षणासाठी दिलासा देणारा वाटत आहे. मात्र यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे. खास करून आंबा व इतर फळबागांना धोका वाढला आहे. नुकसान मोठे ठरत आहे.

Back to top button