यवतमाळ : पत्नीचा खून करणाऱ्या दारव्हा, पुसद येथील पतीला जन्मठेप | पुढारी

यवतमाळ : पत्नीचा खून करणाऱ्या दारव्हा, पुसद येथील पतीला जन्मठेप

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : दारव्हा येथे अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन विवाहितेचा खून करणाऱ्या पती व सासूला येथील दारव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय, पांडुरंग राठोड (वय४०), विमल पांडुरंग राठोड (वय ६०) रा. मोरगव्हाण अशी शिक्षा झालेल्यांची तर प्रियंका संजय राठोड असे मृत महिलेचे नाव आहे.
दारव्हा तालुक्यातील मोरगव्हाण येथे १३ सप्टेंबर २०११ ला ही घटना घडली होती. आरोपी संजय राठोड आणि रामनगर येथील प्रियंका नामदेव जाधव यांचा १२ मे २००९ ला विवाह झाला. काही दिवसांनी पत्नीचा आरोपी पती, सासू व सासरे पांडुरंग परसराम राठोड (६५) यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. छळाला कंटाळून तिने २७ जुलै २०१० ला लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु ३० ऑक्टोबरला आपसी समझोता करून तिला पुन्हा नांदावयास गावी आणण्यात आले. त्यानंतर घटनेच्या दिवशी तिच्यासोबत घरगुती कारणावरून वाद घालून पतीने हातपाय पकडले. सासूने अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले, उपचाराकरिता यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रावरून लाडखेड पोलिस ठाण्याचे पीएसआय भास्कर देवतळे यांनी मृत्यूपूर्व बयाण घेतले. त्यावरून कलम ४९८ ए, ३०७ सह कलम ३४ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी प्रियंकाचा १६ नोव्हेंबर २०११ ला मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास पीएसआय विजय मगर यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आदेश पारित करुन संजय पांडुरंग राठोड, विमल पांडुरंग राठोड यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी पांडुरंग परसराम राठोड यांच्या विरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे यांची मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्तो दिलीप निमकर यांनी काम पाहिले.

पुसद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

केल्याप्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हा निकाल येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश नीता हेमंत मखरे यांनी १ एप्रिल रोजी दिला. दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली.
गजानन हरिभाऊ दुथडे (रा. चिरकुटा, ता. दिग्रस) असे आरोपीचे नाव आहे. गजानन दुथडे हा पत्नी सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्यामुळे सुनीताने २००७ साली दिग्रस पोलिसात तक्रार दाखल केली. २०१३ मध्ये पंचासमक्ष आपसात समझोता होऊन सुनीता पतीकडे पुन्हा नांदावयास गेली. परंतु, आरोपीत सुधारणा न झाल्याने सुनीता मार्च-२०१९ मध्ये माहेरी गांजेगाव (ता. उमरखेड) येथे राहावयास गेली. तिचा मुलगा व मुलगी आरोपी गजानन याच्यासोबत राहू लागले होते. तर सुनीताने
गजानन व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध उमरखेड न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल दाखल केली.१६ जून २०१९ रोजी सुनीता अॅड. प्रेमानंद माळवे यांची भेट घेऊन वहिनीसोबत गांजेगाव येथे परत जात असताना आरोपीने सुनीताला मुलांची भेट घालून देतो, असे म्हणून गाडीवर बसण्यास सांगितले. सुनीता आरोपीच्या गाडीवर बसली. मात्र, आरोपीने नागेशवाडी येथील शेतशिवारातील कॅनॉलच्या पुलाखाली नेले व सुनीताचा स्कार्फने गळा आवळून खून केला. याचा तपास करून सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगोले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रेमांनद माळवे, मयत सुनीता हिची वहिनी जोत्स्ना वाडोरे, मयत व आरोपी यांची मुलगी रविना दुथडे, अतुल सुरोशे, भीमराव सावळे, अॅड. सागर फुलारी आणि डॉ. सागर तगडपल्लेवार यांच्यासह १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने सरकारी वकील अॅड. रवी रूपूरकर यांनी घटनेची जुळविलेली साखळी, सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी गजानन दुथडे यास शिक्षा सुनावली

Back to top button