भारत जोडो’ राहुल गांधींचा ड्रामा : तेजस्वी सुर्या | पुढारी

भारत जोडो' राहुल गांधींचा ड्रामा : तेजस्वी सुर्या

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस मूळ तुकडे -तुकडे पक्ष आहे. देशाच्या विभाजनालाही काँग्रेसच जबाबदार आहे. राहुल गांधी भारत जोडोचा ड्रामा करीत आहेत. ही यात्रा सुरू असतानाच त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते पाकिस्तान समर्थनात घोषणा देत आहेत. त्यांच्याच पक्षातील कर्नाटकातील खासदार देशाच्या विभाजनाची भाषा करीत आहेत. लोकशाही विरोधी असणाऱ्या काँग्रेसजणांकडून देशाच्या एकात्मतेची आशा केली जाऊ शकत नाही, या शब्दात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी घणाघाती टीकास्त्र डागले.

भाजयुमोचे 4 मार्चला नागपुरात राष्ट्रीय संमेलन होत असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा येत आहेत. यासंदर्भात ते आले असता  पत्रकारांसोबत संवाद साधला. सूर्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गत 10 वर्षांमध्ये युवाकेंद्रित विकासावर भर दिला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू आहेत. स्टार्टअप ते कृषी, विज्ञान- तंत्रज्ञानाला  चालना दिली जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. 25 कोटी लोकांना गरीबीपासून मुक्ती मिळाली आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे जनता आमच्यासोबत जोडली जात असून काँग्रेसचे नेते मात्र बेरोजगार होत आहेत. ते स्वतःच्या बेरोजगारीला युवा बेरोजगारीशी जोडून देशाला कन्फ्यूज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेला भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवाणी दाणी, माजी आमदार डॉ आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

नमो युवा महासंमेलन 4 मार्चला, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा येणार

राष्ट्रवादी विचारधारेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन नागपुरात 4 मार्चला राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन होत आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरात आयोजित हे देशातील सर्वात मोठे युवा संमेलन ठरेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा प्रामुख्याने उपस्थित राहतील. यात देशभरातील युवक सहभागी होणार असले तरी एकट्या महाराष्ट्रातून 1 लाख युवक सहभागी होतील. नागपूर जिल्ह्यातून 40,000 युवक सहभागी होणार असल्याची माहिती आज राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी दिली. 2014 आणि 2019 मध्ये युवकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला आशिर्वाद देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोट्यवधी युवकांच्या समर्थनामुळेच 30 वर्षांनंतर देशात पूर्ण बहुमताचे सरकार येऊ शकले. 2024 च्या निवडणुकीतही युवकांचे समर्थन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे देशातील युवकांना जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून नागपुरात होणारे नमो युवा महासंमेलनही त्याचाच भाग असल्याचे सूर्या म्हणाले. दरम्यान,विद्यापीठ परिसरात होणाऱ्या या युवा संमेलनाची जोरदार पूर्वतयारी सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यापीठाच्या परिसराचा राजकीय उपयोग होऊ नये अशी मागणी करण्यात आल्याने हे संमेलन चर्चेत आले आहे.

Back to top button