चंद्रपूर: सास्ती येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर: सास्ती येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  राजुरा तालुक्यातील सास्ती येथे आज ( दि. 2) सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पियुष राकेश सिडाम (वय 17) व साहिल रमेश कुंदलवार (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील सास्ती या गावाला पाणीपुरवठा करणा-या इनटेक विहिरीजवळ नाल्याचे बाजुला वेकोलिच्या चड्डा या कंत्राटी कंपनीने माती टाकल्याने तिथे पाणी जमा होऊन तलाव निर्माण झाला आहे. आज दोन्ही विद्यार्थी शाळेत गेले होते. शाळा सुटल्यावर तलाव सदृश्य जमा झालेल्या पाण्यात हे दोन विद्यार्थी पोहायला गेल्यावर पाण्याचा आणि तेथील गाळाचा अंदाज न आल्याने ते फसले आणि त्यातच त्या दोन्ही मित्रांचा बुडून मृत्यू झाला. यातील एक विद्यार्थी इयत्ता 11 वी व दुसरा इयत्ता 9 वीत शिकत होता.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले. राजुरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह बाहेर काढले. यानंतर कंपनीने नाला रोखून तलाव निर्माण केल्यामुळे कंपनीने तातडीने आर्थिक सहायता द्यावी, अन्यथा दोन्ही विद्यार्थ्यांचा मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा 

Back to top button