बुलढाणा: अग्नीवीर अक्षय गवते पंचत्वात विलिन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

बुलढाणा: अग्नीवीर अक्षय गवते पंचत्वात विलिन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: सियाचीन ग्लेशियर येथे वीरमरण आलेल्या अग्नीवीर अक्षय गवते यांच्या पार्थिवावर आज (दि.२३) दुपारी  पिंपळगाव सराई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.    यावेळी सैन्यदलाच्या वतीने वीरजवान अक्षय यांना अखेरची मानवंदना दिली.

नऊ महिन्यांपूर्वी सैन्यदलात अग्नीवीर म्हणून दाखल झालेल्या अक्षय गवते यांना कर्तव्यावर असताना २० ऑक्टोबररोजी रात्री वीरमरण आले. त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनाने सोमवारी सकाळी गावी आणण्यात आले. अक्षय यांच्या पार्थिवाची राहत्या घरापासून त्यांच्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी मार्गाच्या दुतर्फा रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून गावच्या वीर सुपुत्राला भावपूर्ण निरोप दिला.

भारत माता की जय, वंदे मातरम्, वीर अक्षय गवते अमर रहे आदी घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. सैनिकी अधिका-यांनी राष्ट्रध्वज अक्षय यांच्या कुटूंबियांना सुपूर्द केला. त्यानंतर वडील लक्ष्मण गवते यांनी वीरपुत्राला मुखाग्नी दिला. यावेळी प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर जवान अक्षय गवते यांचे गावात स्मारक उभारण्याची घोषणा आमदार श्वेताताई महाले यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button