अमरावती : भाजप नगरसेविकेच्या त्रासाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर | पुढारी

अमरावती : भाजप नगरसेविकेच्या त्रासाला कंटाळून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा

अंजनगाव सुर्जी येथील गणेशनगर वार्ड क्रमांक 2 मधील उमेश नागोराव चौखंडे (वय33) यांनी अंजनगाव नगरपरिषदेतील नगरसेविकेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. उमेश यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा असून, आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला.

काय लिहीले चिठ्ठीत ?

चौखंडे याने बीजेपी नगरसेविका शीला प्रभाकर सगणे यांचा चिठ्ठीत उल्लेख केला आहे. त्यांच्या घरासमोर असलेली भाजीपाल्याच्या लोटगाडी ठेवण्याची झोपडी पाडण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून वारंवार नोटीस देतात. मुले समाज मंदिरात खेळायला गेल्यावर नगरसेविका घाणेरड्या शिव्या देऊन हाकलून देतात. त्यामुळे माझी मानसिक परिस्थिती ढासळली आहे. मला काहीच सुचत नाही व सहन होत नाही. त्यामुळे नगरसेविकेच्या त्रासाला मी कंटाळलो असून मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या जीवाचे बरं वाईट झाल्यास त्याची चौकशी ठाणेदार व एसपी यांनी करावी असे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

तरुणाची प्रकृती गंभीर

उमेशने झिंक फॉस्फेट नामक विषारी औषधी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला प्रथम अमरावती मधील अंजनगांव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडीत उमेशच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून पोलीसांना माहीती दिली. पोलीस काय भुमीका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. सदर नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असल्याने शहरात याबाबत चर्चेला ऊत आला आहे.

हेही वाचा

Back to top button