नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 लष्करी अधिकारी आणि लष्करी जवानांचाही या अपघातात मृत्यू झाला.
तामिळनाडूतील कुन्नूर येथील घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण प्रताप सिंह यांच्यावर बंगळूरूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत. अशा सुरक्षित हेलिकॉप्टरच्या अपघातावर माध्यमांच्या चर्चेपासून ते सोशल मीडियापर्यंत लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
त्यामुळे व्यथित होऊन हवाई दलाला (Air Force) ट्विटरच्या माध्यमातून आवाहन करावे लागले. भारतीय वायुसेनेने शुक्रवारी ट्विट केले, 'वायुसेनेने ट्राय-सर्व्हिस (तीन सेवांचे एकत्रित) चौकशी न्यायालय स्थापन केले आहे. 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघाताच्या कारणाची चौकशी ही कोर्ट ऑफ इन्क्वायरी करणार आहे. लवकरच तपास पूर्ण केला जाईल आणि जे काही तथ्य आहे ते देशासमोर ठेवले जाईल. तोपर्यंत, दिवंगतांचा वैयक्तिक सन्मान लक्षात घेऊन, कोणत्याही प्रकारचे अनुमान टाळा.
अपघाताचे मुख्य कारण जाणून घेण्यात लोकांची उत्सुकता आहे
खरे तर एमआय-१७व्ही५ सारख्या व्हीव्हीआयपी आणि सुरक्षित हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या सीडीएस बिपिन रावत यांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याचे लोक आणि संरक्षण तज्ज्ञांना पचनी पडलेले नाही. बिपिन रावत यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान हे अपघाताचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर अचानक धुक्यात कसे हरवले हेही दिसून आले आहे. या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही कथित संरक्षण तज्ञांनी टीव्हीवरील चर्चेत पाकिस्तान आणि चीनची नावे घेणे सुरू केले आहे.
हे ही वाचलं का ?