Nagpur Congress : कॉंग्रेसने ऐनवेळी नागपुरात उमेदवार बदलला ?  | पुढारी

Nagpur Congress : कॉंग्रेसने ऐनवेळी नागपुरात उमेदवार बदलला ? 

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागपूर विभाग (Nagpur Congress) मतदारसंघात कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलल्याचे पत्र काॅंग्रेस आमदार विकास ठाकरे आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना पाठविले आहे. मात्र, कॉंग्रेसकडून अधिकृतरित्या अद्यापपर्यंत उमेदवार बदलण्याची कोणतीही जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही.

भाजपमधून काॅंग्रेसमध्ये गेलेले छोटू भोयर यांना काॅंग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र आता छोटू भोयरऐवजी मंगेश देशमुख या अपक्ष उमेदवाराला कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याचे पत्रात म्हंटलं आहे. काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र नागपुरातील कॉंग्रेस आमदारांना पाठविण्यात आले आहे.

या पत्रातील मजकूरानुसार, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दिनांक १० डिसेंबर, २०२१ रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते.

त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस (Nagpur Congress) कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणूकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठींबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात यावी. असे पत्रात म्हंटलं आहे.

तीन उमेदवार, मुख्य लढत भाजप-काँग्रेसमध्ये

नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. तीन उमेदवार रिंगणात आहेत. ५६० मतदार करणार मतदान करतील. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र (छोटू) भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

शुक्रवारी १० डिसेंबरला मतदान आणि १४ डिसेंबरला स्थानिक प्राधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी १० डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पहा व्हिडीओ : जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस |Bipin Rawat | CDS

Back to top button