PM मोदींच्‍या पाया पडून नितीश कुमारांनी बिहारला लाजवले : प्रशांत किशोर | पुढारी

PM मोदींच्‍या पाया पडून नितीश कुमारांनी बिहारला लाजवले : प्रशांत किशोर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या जाहीर पाया पडून बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण बिहारला लाजवले आहे, अशा शब्‍दांमध्‍ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जाहीर सभेत आपली नाराजी व्‍यक्‍त केली. केवळ सत्ता कायम ठेवण्‍यासाठी नितीश कुमारांनी ही कृती केल्‍याचा दावाही त्‍यांनी या वेळी केला.

नेता हा राज्‍यातील जनतेचा अभिमान असतो….

बिहारमधील भागलपूर येथे शुक्रवार, १४ जून रोजी आयोजित एक सभेत बोलताना प्रशांत किशोर म्‍हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्‍या निकालात भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले. यानंतर पंतप्रधानपदाच्‍या शपथविधीपूर्वी एनडीए संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पायाला स्‍पर्श केला. त्‍यांची ही कृतीने संपूर्ण बिहारला लाजवले आहे. कारण एखाद्या राज्याचा नेता हा त्‍या राज्‍यातील जनतेचा अभिमान असतो;पण नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पायांना स्‍पर्श करुन संपूर्ण बिहारला लाज आणली आहे.”

तेव्‍हा नितीश कुमारांची विवेकबुद्धी विकली गेली नव्हती

लोक मला विचारात की मी आता नितीश कुमारांवर टीका का करत आहे. कारण २०१५ विधानसभा निवडणुकीत मी त्‍यांच्‍या पक्षाचा प्रचार केला होता. यानंतर दोन वर्षांनी ही त्‍यांच्‍या पक्षात औपचारिकपणे प्रवेशही केला होता. त्‍यावेळी नितीश कुमार हे एक वेगळे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. त्‍यांनी आपली विवेकबुद्धी विकली नव्‍हती. त्‍यामुळे मी त्‍यांच्‍यासोबत त्‍यावेळी काम केले, असेही प्रशांत किशोर यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सारी धडपड सत्तेत कायम राहण्‍यासाठी

नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएमधील नितीश कुमारांच्‍या जनता दल संयुक्‍त ( जेडीयू) पक्षाला १२ जागा मिळाल्‍या आहेत. भाजप सरकार पुन्‍हा सत्तेत येण्‍यात नितीश कुमारांची महत्त्‍वाची भूमिका आहे; पण बिहारचे मुख्यमंत्री त्यांच्या पदाचा कसा फायदा घेत आहेत? ते राज्याच्या फायद्याची खात्री करण्यासाठी आपल्या ताकदीचा वापर करत नाहीत. याची खात्री करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या पायाला स्‍पर्श करत आहेत. २०२५मध्‍ये पुन्‍हा एकदा विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत राहण्‍यासाठी त्‍यांची धडपड सुरु आहे, असा आरोपही प्रशांत किशोर यांनी या वेळी केला.

Back to top button