नागपूर: वन विभागाकडून पहिला पेडियट्रिक वार्ड सुरू | पुढारी

नागपूर: वन विभागाकडून पहिला पेडियट्रिक वार्ड सुरू

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राज्य वन विभागाकडून नागपुरातील सेमिनरी हिल्सस्थित ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला “पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु झाला आहे. खास उन्हाळ्याच्या दृष्टीने या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर केवळ उपचारच नाही, तर नव्या उमेदीने जगण्यासाठी त्यांना मायेची ऊबही दिली जात आहे.

एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे वादळी पाऊस असे विचित्र वातावरण आहे. उन्हाचा पारा 42 ते 44 अंशावर गेला आणि पुन्हा पावसाने खाली आला. भीषण उन्हाळ्यात जंगलातील प्राणी व त्यांच्या पिल्लांना उन्हाचा अधिकच त्रास सहन करावा लागतो. हे लक्षात घेता वन विभागाने वन्य प्राण्यांसाठीच्या ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या छोट्या पिल्लांसाठीचा देशातील पहिला “पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु केला आहे.

याशिवाय आईपासून दुरावलेले, अपघातात जखमी झालेल्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर या ठिकाणी उपचार सुरु आहेत. आजवर आपण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी खास पेडियाट्रिक वार्ड सज्ज बघितले आहेत. मात्र, आता वन विभागाच्या पुढाकाराने वन्य प्राण्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी भारतातील हा पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरु झाला आहे.

सेमिनरी हिल भागातील वन्य प्राण्यांसाठीच्या “ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर”मध्ये हा “पेडियाट्रिक वॉर्ड” सुरु केला असून, या खास पेडियाट्रिक वॉर्डमध्ये सध्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांना उपचारासह मायेची ऊब दिली जात आहे. घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांच्या संघर्षात किंवा जंगलातील विविध घटनांमध्ये जखमी झालेली वन्य प्राण्यांची पिल्ले आई गमावल्यानंतर अनाथ झालेल्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांना या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. सध्या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये अस्वल, बिबट, कोल्हा, माकड, हरीण, विविध प्रकारचे पक्षी, कासव, साप यांची पिल्लं उपचार घेत आहेत. ते बरे होऊन पुन्हा नैसर्गिक अधिवासात खेळण्यासाठी झेपावण्याच्या तयारीत आहेत.

Back to top button