Chandrapur Police: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर खबरदार; जावे लागेल तुरूंगात | पुढारी

Chandrapur Police: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकाल तर खबरदार; जावे लागेल तुरूंगात

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु असून या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे.  चंद्रपूर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. व्हॉटसॲप, फेसबुक,  एक्स आदी समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या ऑडीओ, व्हिडिओ व संदेश टाकण्यात येतात आणि त्या पोस्टवर अन्य लोक लाईक व कॉमेन्टस् करुन शेअर करतात. तसेच सोशल मीडियावर खोट्या बातम्या प्रसारित करणारे ऑडिओ, व्हिडीओ व संदेश व्हायरल होत आहे. काही व्यक्ती व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने प्रतिपक्ष उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटुंबियांना लक्ष करुन द्विअर्थी आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतात. Chandrapur Police

 निवडणूक काळात या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी वैयक्तिक व आक्षेपार्ह टीका टिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतेही व्हिडिओ, फोटो एडीट करुन आक्षेपार्ह भासवून पोस्ट करु नयेत, किंवा त्यास लाईक व कॉमेन्टस् करुन अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करु नयेत. सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करताना सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Chandrapur Police

असा  प्रयत्न केला, तर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचा इशारा चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे. असे प्रकार आढळून आले तर नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील  8888511911 या क्रमांकावर माहिती द्या, असे आवाहन  चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

हेही वाचा 

Back to top button