आमचा पक्ष, चिन्ह शरद पवारच: अनिल देशमुख | पुढारी

आमचा पक्ष, चिन्ह शरद पवारच: अनिल देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सर्व ठरल्याप्रमाणे सूड बुद्धीचे राजकारण सुरू आहे. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांना दिली.
आता आमचा, शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांना दिला. मात्र, सर्वांना माहीत आहे हा पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष, आमचे चिन्ह शरद पवार आहेत. सूड बुद्धीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

मात्र, ज्यांनी हे घडविले त्यांना जनता धडा जनता शिकवेल. मुळात सगळ्यात जास्त अस्थिरता भाजपच्या आमदारांत आहे. कारण बाहेरून आलेले पहिल्या पंगतीत बसले, मंत्री झाले आता आपले काय होईल, याची त्यांना चिंता आहे. आपल्या मतदारसंघात कामे व्हावीत, काही आमदार निधीसाठी त्यांच्याजवळ गेले. मात्र, लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. तिकडे गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला.

मविआच्या एकत्रित सभा होतील, तेव्हा वातावरण बदललेले असेल, यावर भर दिला. दरम्यान, माझ्या मतदार संघात पारडसिंगा येथे भाजपने आज एक महिला मेळावा आयोजित केला. हा त्यांचा अधिकार आहे. मात्र खंड विकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठविले. तुम्ही लोकांना घेऊन या. शासकीय पत्र काढून हे सांगितलं जाते आहे. मेळावा भाजपचा मात्र त्यासाठी खर्च सरकारचा केला जाणार असल्याने याची रीतसर तक्रार आम्ही करू, पक्षाच्या मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर आतापर्यंत झाला नाही. तो आता होत आहे असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

हेही वाचा 

Back to top button