नागपूर: कोराडीत राख बंधाऱ्यातील पाण्याचा बांध फुटला, ८ ट्रक पाण्यात | पुढारी

नागपूर: कोराडीत राख बंधाऱ्यातील पाण्याचा बांध फुटला, ८ ट्रक पाण्यात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या मागील भागात असलेल्या राख बंधाऱ्याच्या आतील पाणी अडवणारा बंधारा आज (दि.६) पहाटे फुटल्याने तारांबळ उडाली. एकदम पाणी बाहेर पडल्याने राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यापूर्वी राख बंधारा फुटल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार ही राख फुकट उचलून इतरांना देतात. आज पहाटे नेहमीप्रमाणे या ठिकाणी बंधाऱ्याच्या आतमध्ये राख उचलण्याचे काम सुरू होते. यादरम्यान, एका जेसीबीचा पंजा आतमधील पाणी अडवलेल्या बंधाऱ्यावर पडल्याने बंधाऱ्यातील पाणी बाहेर निघण्यास सुरुवात झाली. काही वेळातच राखेची उचल होणाऱ्या भागात हे पाणी शिरल्याने राख उचल करण्यासाठी प्रतीक्षेत असलेले आठ ट्रक पाण्यात बुडाले. तातडीने ही माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

पूर्वानुभव लक्षात घेता तातडीने अधिकारी घटनास्थळी पोहचले. महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही निःशुल्क उपलब्ध करून दिलेली राख उचलण्याचे काम खासगी व्यक्तीकडे आहे. राख काढताना पाण्याची अडचण होऊ नये, म्हणून आत पाणी अडवण्यासाठी राखेचा एक बंधाराही तयार केला आहे. आज पहाटे पाणी अडवून ठेवणारा हाच बंधारा फुटला. ट्रक पाण्यात बुडाले सुदैवाने चालक, क्लिनर बाहेर पडले. या घटनेमुळे राख उचल करणारे ट्रक बाहेर निघण्यास काही काळ लागणार आहे. ट्रकचे नुकसान वगळता इतर कोणतेही नुकसान नसल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.

दरम्यान, मौदा येथील ‘एनटीपीसी’ प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्याचे आतून निरीक्षण केल्यास तेथे बंधाऱ्याच्या आतही विविध कप्पे करण्यात आले आहे. प्रत्येक कप्यात जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन आहे. तेथपर्यंत वाहनेही जातात. हे बांधकाम चांगल्या दर्जाचे आहे. परंतु कोराडीत महानिर्मितीच्या राखेच्या बंधाऱ्यात काहीही नियोजन नाही. त्यामुळे कधी बंधारे फुटणे, तर कधी इतर अनुचित घटना येथे घडतात.

हेही वाचा 

Back to top button