Congress Rally : काँग्रेस म्हणते, भाजपशी लढायला ‘है तयार हम’…!, गुरूवारी महारॅली | पुढारी

Congress Rally : काँग्रेस म्हणते, भाजपशी लढायला 'है तयार हम'...!, गुरूवारी महारॅली

नागपूर, पुढारी वृतसेवा : काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस गुरूवारी (दि. २८) नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत महारॅलीने साजरा केला जात आहे. शेतकरी, बेरोजगार, भ्रष्टाचार विरोधी लढाईसाठी ‘है तैयार हम..’ असा संदेश या महारॅलीमुळे देशातील जनतेला दिला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. Congress Rally

नागपुरातील ज्या दिघोरी टोल नाका परिसरातील मैदानात हा मेळावा होत आहे. त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले असून जवळच असलेल्या पांडव कॉलेजमधून या सभेची पूर्वतयारी सुरू आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज या मैदानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशात परिवर्तन घडविणारी ही रॅली ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Congress Rally

१९२० मध्ये नागपूरमधूनच महात्मा गांधी यांनी अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलन पुकारले. अखेरीस १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले, हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९ मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा झाली. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा 139 वा स्थापना दिवस साजरा होत आहे. या सभेतून देशातील काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास आहे.

या सभेच्या पूर्वतयारीसाठी आज अनेक नेते, एआयसीसी पदाधिकारी नागपुरात डेरेदाखल झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मूकुल वासनिक, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी,अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे आदी परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा 

Back to top button