नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. विविध निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहीली आहे. अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे. काँग्रेसने संघटनेत केलेल्या बदलांमध्ये प्रियंका गांधी यांच्याकडून उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. यानंतर त्यांची भूमिका काय असणार यावर चर्चा होती. या चर्चांना काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुर्णविराम दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात प्रियंका गांधींकडे महत्वाची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी गठीत करण्यात आलेल्या जाहिरनामा समितीतही प्रियंका गांधींचा समावेश आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश याबाबत बोलताना म्हणाले की, प्रियंका गांधी पक्षाच्या सरचिटणीस आहेत, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीतही त्या महत्वाची भूमिका बजावतील. यावेळी बोलताना जागावाटपावरही त्यांनी भाष्य केले. जागावाटपासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला लक्षात घेऊन चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्ष आघाडीत सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत मात्र आम्ही स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेत नाही, सर्व पक्ष एक आहेत, असेही ते म्हणाले. जागावाटपावर अगदी मोकळेपणाने सर्वसामावेशक चर्चा होईल. जागावाटपाबाबत आम्ही गंभीर आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी तशी स्पष्ट भूमिका नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबरला नागपुरात एक मोठी सभा होणार आहे. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि देशभरातील नेते या सभेला येणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल या निवडणुकीतुन काँग्रेस वाजवणार आहे, अशीही माहिती जयराम रमेश यांनी दिली.