नीट परीक्षेत कमी गुण पडल्याने तरुणीची बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या | पुढारी

नीट परीक्षेत कमी गुण पडल्याने तरुणीची बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या

अमरावती; पुढारी वृत्तसेवा

नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे पाहून एका तरुणीने मानसिक तणावात येऊन राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहल भारत कोरडे (21 रा. गोपाल नगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गोपालनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

मैत्रिणीला पाहायला लावला निकाल

स्नेहल ही मेडिकलला प्रवेश मिळावा, यासाठी धडपड करीत होती. ती दोन ते तीन वर्षांपासून नीटची परिक्षा देत होती. यंदा आपल्याला 550 गुण मिळाले की, आपण मेडिकलला प्रवेश घेऊन असे स्वप्न तिने पाहिले होते. सप्टेंबर 2021 मध्ये तीने नीटची परीक्षा दिली. 2 नोव्हेंबर रोजी निटचा निकाल येणार होता. नीटचा निकाल लागल्यानंतर तीने तो स्वत: न पाहता आपल्या मैत्रिणीला पाहायला सांगितले. परंतु स्नेहलला यंदा 292 गुणच मिळाले. ही बाब मैत्रीणीने सांगताच पुन्हा स्नेहलच्या पदरी निराशा पडली. गुण मिळाल्याचे पाहून स्नेहल मानसिक तणावात आली.

बाथरूममधील शॉवरला लावला गळफास

2 नोव्हेबर रोजी नीटचा निकाल कळल्यानंतर स्नेहल घरी पोहोचली. त्यावेळी तिचे वडिल भारत कोरडे यांनी स्नेहलला निकालबद्दल विचारणा केली. परंतु निकाल यायचा आहे, असे स्नेहलने वडिलांना सांगितले. त्यानंतर स्नेहल आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळापर्यंत ती बाहेर परतली नाही. त्यामुळे स्नेहलची बहिण तिला बोलाविण्यासाठी गेली.

बाथरूममधून काही आवाज आवाज आला नाही, म्हणून बहिणीने दारातून आत पाहिले. त्यावेळी स्नेहलने शॉवरच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. बहिणीने ओरडाओरड करताच तिचे कुटुंबीय बाथरूमकडे धावून गेले. त्यांनी स्नेहलला गळफासावरून काढून तत्काळ रिम्स हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाला. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी चौकशी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Back to top button