चंद्रपूर : दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका, दोन संशयीत ताब्यात | पुढारी

चंद्रपूर : दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका, दोन संशयीत ताब्यात

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या एशियाटिक सॉफ्ट शेल या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची गोंडपिपरी पोलिसांनी सुटका केली असून तीन संशयीतांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी पोलिसांना भंगारपेठ येथील संशयीत प्रमोद भगाकर पोटे (वय 37, रा.भंगारपेठ, ता. गोंडपिपरी) याच्या घरी एशियाटिक सॉफ्ट शेल या दुर्मिळ प्रजातीचे कासव विक्री करण्यासाठी ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे भंगार पेठ येथे छापा टाकून घराची झडती घेण्यात आली. या कारवाईवेळी एशियाटिक सॉफ्ट शेल या दुर्मीळ प्रजातीचे कासव आढळून आले. ज्याची किंमत 25 हजार रुपये ठेवण्यात आली होती. पोलिसांनी प्रमोद भगाकर पोटे याला ताब्यात घेऊन चौकीशी केली असता त्याला हे दुर्मीळ प्रजातीचे कासव रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार (रा. शिवणी देशपांडे, ता. गोंडपिपरी) याच्या कडून मिळाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार यालाही अटक करण्यात आली आणि दोघा संशयीतांना वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र (ता.गोंडपिपरी) यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्वाधीन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु याच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु, वंदीराम पाल, नंदकिशोर माहुरकर, अनुप निकुरे, प्रेम चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पो. उपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुजावर अली व कार्तीक खनके यांनी ही कारवाई केली.

Back to top button