पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणा विरोधात आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रधान सचिवांकडे तक्रार | पुढारी

पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणा विरोधात आमदार प्रतिभा धानोरकर यांची प्रधान सचिवांकडे तक्रार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खाजगीकरणाच्या विरोधात काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (दि 5) लेखी तक्रार दाखल केली. मंत्रालयातील नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत ही तक्रार देण्यात आली. या बैठकीत आमदार धानोरकर यांचेसह चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवार, जनविकास सेनेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा योजनेचे  खाजगीकरण करण्यात येत असल्याचा आरोप भाजप वगळता इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांनी केला होता. मनपा आयुक्तांकडे तक्रार करून माजी नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या योजनेच्या प्रस्तावित खाजगीकरणा विरोधात गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर एक दिवसीय, उपोषण व धरणे आंदोलन व उपोषण केले. त्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाचा विरोध करणाऱ्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना चर्चेसाठी बोलावून घेतले. तसेच प्रधान सचिवांकडे याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

आज याबाबत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे झालेल्या बैठकीत आमदार धानोरकर यांनी चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजनेचे प्रस्तावित खाजगीकरण मागे घेण्याची मागणी केली. काम पूर्ण केल्यानंतर एक वर्षापर्यंत अमृत पाणीपुरवठा योजनेची चाचणी घेण्याची जबाबदारी अमृतच्या कंत्राटदाराची असल्याचे आमदार धानोरकर यांनी सचिव यांचे निदर्शनात आणून दिले. यापूर्वीच्या मनपाच्या महासभेने व स्थायी समितीने  कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळांची नियुक्ती करून मनपातर्फे  पाणीपुरवठा योजना चालवण्याचा निर्णय  घेतला आहे. मागील तीन वर्षांपासून मनुष्यबळाचा पुरवठा करून योजना चालवण्याचे काम मनपा करीत आहे.असे असताना संपूर्ण पाणीपुरवठा योजना चालविण्याकरिता निविदा प्रकाशित करण्यात आली. पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण करण्याचा  मनपाचा प्रयत्न असून खाजगी करण्यासाठी काढलेले कंत्राट रद्द करण्याची मागणी आमदार धानोरकर यांनी या बैठकीत केली.

Back to top button