भंडारा: अखेर पोलिस पाटील पदभरती रद्द: नवनियुक्त पोलिस पाटलांच्या स्वप्नांचा चुराडा | पुढारी

भंडारा: अखेर पोलिस पाटील पदभरती रद्द: नवनियुक्त पोलिस पाटलांच्या स्वप्नांचा चुराडा

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भंडारा आणि पवनी तालुक्यातील पोलिस पाटलांची पदभरती अखेरीस शासनाच्या आदेशाने भंडारा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी रद्द केली आहे. भरती रद्द झाल्याने नवनियुक्त पोलिस पाटलांच्या पायाखालील जमीन सरकली असून त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आता ही भरती प्रक्रिया नव्याने घेतली जाणार आहे.

एप्रिल महिन्यात भंडारा विभागातील भंडारा आणि पवनी तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटलांच्या एकूण ४९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी परीक्षा झाल्यापासून ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला नव्हता. तरीसुद्धा सरसरकट सर्वच उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. त्यातही उमेदवारांना फक्त नाव, गाव विचारुन बाहेर काढण्यात येत होते. त्यामुळे या प्रक्रियेत मोठा सावळागोंधळ असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यादरम्यान, निवड समितीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्रसुद्धा दिले होते.

तथापि, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्राप्त तक्रारींची प्राथमिक चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून आले. समितीने मौखिक गुण देताना दुजाभाव केल्याचे दिसून आले. त्यांनी तसा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविला. विभागीय आयुक्तांनी तो अहवाल शासनाकडे पाठविला. या अहवालावरुन ही भरती प्रक्रिया राबविणारे भंडाराचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे तसेच पवनीच्या तत्कालिन तहसीलदार निलीमा रंगारी यांना निलंबित करण्यात आले.

अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर पोलिस पाटलांची भरतीसुद्धा नव्याने घेण्याची मागणी होऊ लागली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, युवराज रामटेके, प्रमोद केसलकर, राधे भोंगाडे, अंकूश वंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरती रद्द करुन नव्याने घेण्याची मागणी केली होती. ४ जुलैरोजी संपूर्ण पोलिस पाटलांची पदभरती रद्द केल्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले. त्यामुळे नवनियुक्त पोलिस पाटलांमध्ये धडकी भरली आहे. शासनाने पोलिस पाटील पदभरतीची प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली असून ही भरती नव्याने होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button